मनसे आमदार राजू पाटील अजित पवारांच्या भेटीला

| Updated on: Jan 29, 2020 | 11:16 AM

कल्याण डोंबिवलीतील नागरिकांच्या विविध प्रश्नांसंदर्भात आमदार राजू पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली.

मनसे आमदार राजू पाटील अजित पवारांच्या भेटीला
Follow us on

कल्याण : मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली (MNS Raju Patil Meet Ajit Pawar) आहे. भाजप मनसेच्या युतीच्या चर्चा जोरावर असतानाच राजू पाटील यांनी राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. मात्र ही भेट राजकीय नसल्याची माहिती आहे.

कल्याण डोंबिवलीतील नागरिकांच्या विविध प्रश्नांसंदर्भात आमदार राजू पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. 27 गावांची स्वतंत्र नगरपालिका बनवण्याची मागणी राजू पाटील यांनी केली.

27 गावांसाठी आगामी अर्थसंकल्पात विशेष निधीची तरतूद करण्यात यावी, अशीही इच्छा राजू पाटलांनी बोलून दाखवली. त्याचप्रमाणे कल्याण ग्रामीण मतदार संघात येणाऱ्या दिवा शिळ डायघर विभागात टोरंट कंपनीला स्थगिती देण्यात यावी, अशीही मागणी राजू पाटील यांनी अजित पवारांकडे केली.

राजू पाटील हे मनसेचे एकमेव आमदार विधानसभेवर निवडून आले आहेत. राजू पाटील हे कल्याण ग्रामीण मतदारसंघातील आमदार आहेत. मनसेची खिंड लढवण्याची जबाबदारी राजू पाटलांवर आहे. त्यामुळे कल्याणच्या ग्रामीण भागातील नागरिकांच्या मागण्यांचा पाठपुरावा पाटील (MNS Raju Patil Meet Ajit Pawar) कसे करतात, हे पाहणं उत्सुकतेचं आहे.


कोण आहेत राजू पाटील?

प्रमोद उर्फ राजू रतन पाटील यांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत कल्याण ग्रामीण मतदारसंघातून विजय मिळवला आहे. त्यांना 86 हजार 233 मतं मिळाली होती. त्यांच्याविरोधात शिवसेनेचे रमेश म्हात्रे निवडणूक रिंगणात होते. म्हात्रे यांनी राजू पाटील यांना कडवी झुंज दिली. रमेश म्हात्रे यांना 80 हजार 665 मतं मिळाली होती.

मनसेच्या एकमेव आमदाराला खुद्द राज ठाकरेंकडून खुर्चीची ऑफर

मनसेने या विधानसभा निवडणुकीत एकूण 110 उमेदवारांना निवडणूक रिंगणात उतरवलं होतं. त्यापैकी मनसेला केवळ एकाच जागेवर विजय मिळवता आला.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राजू पाटील यांना ‘कृष्णकुंज’वर बोलावून त्यांची भेट घेतली होती. राज ठाकरे यांनी स्वतः राजू पाटील यांचं स्वागत करत त्यांचं अभिनंदन केलं होतं. विशेष म्हणजे राज ठाकरे यांनी राजू पाटील यांना स्वतःची खुर्ची देऊ केली होती. मात्र, राजू पाटील यांनी आदराने त्या खुर्चीवर बसण्यास नकार दिला होता.