राज साहेब सांगतील युतीत लढायचं, तेव्हा आम्ही युतीत लढू; आमदार राजू पाटील यांचं मोठं विधान

| Updated on: Oct 24, 2022 | 12:24 PM

हे सरकार आम्ही दिलेल्या सूचना ऐकतं. त्यानुसार काम करतं. अशी कामे होत असताना जर जवळीक होत असेल तर त्यातून वेगळा अर्थ काढण्याची आवश्यकता नाही.

राज साहेब सांगतील युतीत लढायचं, तेव्हा आम्ही युतीत लढू; आमदार राजू पाटील यांचं मोठं विधान
राज साहेब सांगतील युतीत लढायचं, तेव्हा आम्ही युतीत लढू; आमदार राजू पाटील यांचं मोठं विधान
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

कल्याण: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी मनसेच्या दीपोत्सवाच्या कार्यक्रमात येऊन आपल्याला मुंबई महापालिकेवर भगवा फडकवायचा आहे, असं विधान केलं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांच्यासमोरच फडणवीस यांनी हे विधान केल्याने मनसे-भाजप युतीच्या चर्चांना उधाण आलेलं आहे. ही चर्चा सुरू असतानाच मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील (raju patil) यांनीही मोठं विधान केलं आहे. राज साहेब सांगतील युतीत लढायचं. तेव्हा आम्ही युतीत लढू, असं राजू पाटील म्हणाले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा मनसे-भाजप युतीच्या चर्चांना हवा मिळाली आहे.

राजू पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना हे विधान केलं. आमदार राजू पाटील यांनी फडके रोडवरील गणेश मंदिरात दर्शन घेतलं. त्यानंतर दिवाळी पहाट या कार्यक्रमात सहभागी होत कल्याण-डोंबिवलीकरांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. राज ठाकरे प्रत्येक मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन राज्यातील कामे सांगतात. मागच्या अडीच वर्षात त्यांनी मुख्यमंत्र्यांना वेळ मागितली असेल. पण त्यांना वेळ दिला नसेल. मागच्या सरकारने राज ठाकरेंचं ऐकून घेतलं नसेल. पण हे सरकार तसं वागत नाही, असं राजू पाटील म्हणाले.

हे सुद्धा वाचा

हे सरकार आम्ही दिलेल्या सूचना ऐकतं. त्यानुसार काम करतं. अशी कामे होत असताना जर जवळीक होत असेल तर त्यातून वेगळा अर्थ काढण्याची आवश्यकता नाही. परंतु जवळीक चांगली आहे. हे एक चांगलं रसायन दिसून येतं. एकमेकांना समजून घेत आहेत. कामे होत आहेत, असं त्यांनी सांगितलं.

आम्ही काही सत्तेत नाही. सत्तेत बसायच्या आधी आम्ही भाजपला मतदान केलं होतं. आम्ही सरकारला पाठिंबा दिलेला आहे. अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. पण त्याकडे विशिष्ट चष्म्यातून पाहू नये. आम्ही स्वतंत्र लढणार आहोत. पण ज्या दिवशी राज साहेब म्हणतील युतीत लढायचं, तेव्हा आम्ही युतीत लढू. राज साहेबांचा आदेश आमच्यासाठी शेवटचा आहे, असं ते म्हणाले.

आम्ही निवडणुकीत मोजक्याच जागा लढवल्या होत्या. आमचे आमदार निवडून आल्यावर ते सक्षम विरोधी पक्षाचे काम करतील असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं होतं. जेव्हा कामं होत नाही. काम रखडतात किंवा कामे स्लो होतात तेव्हा जनतेचा आवाज बनून आम्ही टीकेची झोड उठवतो. आम्ही सत्ताधाऱ्यांना जागं करण्याचं काम करतो. येथील सहा विधानसभांपैकी या मतदारसंघात खासदार श्रीकांत शिंदे यांनी जास्त निधी दिला. त्याचा मला अभिमान वाटतो, असं सांगतानाच आम्ही राजकीय विरोधक असून एकमेकांचे शत्रू नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.