ठाणे : गेल्या काही दिवसांपासून ठाण्यात मनसे आणि भाजप या पक्षांमधील वाद चांगलाच पेटलेला दिसतो आहे. काल ठाण्यात आयोजित केलेल्या शेतकरी ते थेट ग्राहक या अंतर्गत मनसेतर्फे आंब्याचा एक स्टॉल लावण्यात आला होता. मात्र हा स्टॉल अनधिकृत असून तो लवकरात लवकर हटवा अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांनी पालिकेकडे केली. या कारणामुळे मनसे आणि भाजपचे कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. या राड्यानंतर मनसेने आक्रमक भूमिका घेत येत्या 17 मे ला ठाण्यात मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या मोर्च्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वत: उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मनसेचे ठाणे-पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. अवघ्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील चौथ्या टप्प्यातील मुंबई, ठाणे, रायगड या ठिकाणच्या लोकसभा जागांवरील मतदान पार पडलं. मतदानानंतर सर्वत्र राजकीय वातावरण शांत असताना ठाण्यात काल अचानक मनसे आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले.
नेमकं प्रकरण काय ?
ठाण्यातील नौपाडा येथे शेतकरी ते ग्राहक या कार्यक्रमातंर्गत मनसेतर्फे एका शेतकऱ्याने रस्त्यावर आंब्याचा स्टॉल लावला होता. मात्र हा स्टॉल अनधिकृत असून यामुळे नागरिकांना चालण्यास त्रास होतो. त्यामुळे हा आंब्याचा स्टॉल लवकरात लवकर हटवा अशी मागणी भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी केली. मात्र या स्टॉलच्या शेजारी असलेल्या अनधिकृत गाळा आधी हटवा, नंतर आम्ही आंब्याचा स्टॉल हटवतो अशी भूमिका मनसेच्या कार्यकर्त्यांनी घेतली. यानंतर भाजपने मनसेच्या कार्यकर्त्यांना धक्काबुक्की करत राज ठाकरे हाय हायच्या घोषणा दिला. तर मनसेच्या कार्यकर्त्यांनीही चौकीदार चोर हे अस म्हणतं भाजपविरोधात घोषणाबाजी केली. या प्रकरणानंतर ठाण्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.
काल ठाण्यातील नौपाडा येथे घडलेल्या संपूर्ण प्रकारानंतर ठाणे महापालिकेतर्फे मनसेच्या आंबा स्टॉलला परवानगी नाकरण्यात आली आहे. तसेच या स्टॉलवरील शेतकऱ्याला नोटीसही पाठवण्यात आली आहे. आंबा विक्रेत्या शेतकऱ्याला पाठवलेल्या नोटीसीवरुन मनसेतर्फे ठाणे महापालिका प्रशासन आणि भाजपा विरोधात मोर्चा काढण्यात येणार आहे. येत्या 17 मे रोजी या मोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्च्यात ठाण्यातील शेतकरी आंबा विक्रेते आणि मनसे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. तसंच या मोर्च्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरेही उपस्थित राहणार असल्याची शक्यता मनसेचे ठाणे-पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी व्यक्त केली आहे.
संबंधित बातम्या :
VIDEO : ठाण्यात आंब्याच्या स्टॉलवरुन मनसे आणि भाजपचे कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा