नागपूरः मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या भेटीने आज राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. राज ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर आहेत. विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपुरात (Nagpur) सुरु असल्याने राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची त्यांच्या दालनातच जाऊन भेट घेतली. या भेटीमागील नेमकं कारण अद्याप समोर येऊ शकलेलं नाही. मात्र राज ठाकरेंची ही सदिच्छा भेट असल्याचं म्हटलं जातंय. या भेटीच्या वेळी मनसे आमदार राजू पाटील हेदेखील उपस्थित होते.
राज ठाकरे आणि शिंदे यांच्या भेटीत विधीमंडळातील कामकाजासह अन्य विषयांवर चर्चा झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी केलेल्या ट्विटमधून देण्यात आली आहे. राज ठाकरे यांच्या भेटीचे काही फोटो शिंदे यांनी ट्विट केले आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज नागपूर विधान भवनातील दालनात सदिच्छा भेट घेतली.
यासमयी विधिमंडळातील कामकाजासह अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली.
याप्रसंगी मनसे आमदार राजू पाटील उपस्थित होते.@RajThackeray @mnsadhikrut pic.twitter.com/70sPuTCChk
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) December 23, 2022
तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ट्विटर हँडलवरदेखील या भेटीचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
मनसे अध्यक्ष @RajThackeray नागपूर दौऱ्यावर आहेत. सध्या महाराष्ट्र विधानसभेचं हिवाळी अधिवेशन सुरु आहे. त्याचंच औचित्य साधून सन्मा. राजसाहेबांनी नागपूर विधानसभेच्या मुख्यमंत्री दालनात जाऊन राज्याचे मुख्यमंत्री सन्मा. श्री. एकनाथराव शिंदे ह्यांची सदिच्छा भेट घेतली. pic.twitter.com/3NQFm0yrCZ
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) December 23, 2022
गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि भाजप युतीची जोरदार चर्चा आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे भाजपला साथ देण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. या पार्श्वभूमीवर या दोन नेत्यांची भेट महत्त्वाची मानली जातेय.
आगामी निवडणुकांच्या अनुषंगानेच राज ठाकरे यांनी आज नागपुरात मनसे कार्यकर्त्यांना प्रोत्साहित केलं. राजकारणात मेहनत आणि संघर्षाशिवाय पर्याय नाही. लोक तुमच्या अपयशावर हसतील पण तुम्ही खचून जाऊ नका, काम करत रहा, असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं.