मुंबईः पक्षाची निशाणी असो ना नसो, नाव असो वा नसो, माझ्याकडे विचार आहे. त्याबाबतीत मी श्रीमंत आहे, असा टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांना लगावला. शिवसेना कुणाची, शिवसेनेचं (Shivsena) चिन्ह धनुष्यबाण कुणाकडे जाणार या मुद्द्यावरून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उद्धव ठाकरे या दोन गटांमध्ये दावे-प्रतिदावे सुरु आहेत. पक्षांतर्गत मोठं बंड झाल्याने शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हातातून पक्ष निसटण्याची चिन्हे दिसू लागलीत. त्यामुळे शिवसेनेचं अस्तित्वच धोक्यात असल्याचं म्हटलं जातंय. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठं विधान केलंय. पक्षाचं चिन्ह किंवा नावाची चिंता मला नाही, कारण माझ्याकडे विचारांची श्रीमंती आहे.
उद्धव ठाकरेंवर टीका करताना राज ठाकरे म्हणाले, ‘ माझ्या आजोबांचा बाळासाहेबांचा विचार मला पुढे न्यायचा आहे. ती गोष्ट पुढे नेण्याची गरज आहे. माझ्याकडे निशाणी असली काय आणि नसली काय, नाव असलं काय नसलं काय माझ्याकडे विचार आहे. सर्वात मौल्यवान गोष्ट असेल तर माझ्याकडे विचार आहे. बाकी सगळं सोडा. पण त्याबाबतीत मी श्रीमंत आहे. आणि या महाराष्ट्रात ज्या महापुरुषांनी विचार पेरलं. ते ऐकणं त्यातून बोध घेणं. ती गोष्ट सर्वांनी केल्या पाहिजे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लांबणीवर पडलेल्या निवडणुकांविषयी बोलताना राज ठाकरे म्हणाले, ‘ निवडणुका कधी होतील माहीत ननाही अगं अगं म्हशी हेच चालू आहे. निवडणुका कधीही लागतील. दिवाळीच्या आधी लागतील असं वाटत नाही. नोव्हेंबर डिसेंबर कदाचित जानेवारी आणि फेब्रुवारीतही लागतील. चिखल झालाय. कारण कोणी विचारणारा नाही. आता जिल्हा परिषदा पुढे ढकलल्या. महापालिका तीनचं की दोनचं. वॉर्डाला तीन माणसं चार माणसं. लोक काय गुलाम आहेत का?
राज्यातील निवडणुकांसाठी प्रभाग रचनेविषयीचा निर्णय वारंवार बदलला जातोय. यावर टीका करताना राजा ठाकरे म्हणाले, ‘ लोकांना तर हल्ली नगरसेवकही माहीत नसतो. चार चार माणसांचा प्रभाग करताय. तो भाग कोणी बघायचा. कुणाला कळत नाही. कुठे जावं. कारण लोक जाब विचारत नाही. एकदा लोकांनी ठरवलं पाहिजे. खेळ मांडलाय नुसता. गृहित धरलंय लोकांना. तीनचा चारचा एकचा प्रभाग करा. लोकं येतील, जातील कुठे , त्यात पैसे वाटण्याची सुरुवात होते. आज नाही लक्षात येणार. काही वर्षानंतर लक्षात येईल. काय महाराष्ट्र होता आणि काय मातेरं केलं.