ना युती, ना आघाडी! मनसेचा एकला चलो रे चा नारा, बैठकीत निर्णय?

| Updated on: Oct 11, 2022 | 1:35 PM

महापालिका निवडणुकीच्या आधी मनसे आणि भाजप यांची युती होणार असल्याची चर्चा होती. या चर्चांना पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे.

ना युती, ना आघाडी! मनसेचा एकला चलो रे चा नारा, बैठकीत निर्णय?
Follow us on

विनायक डावरुंग, प्रतिनिधी, मुंबई : महापालिका निवडणुकीच्या आधी मनसे आणि भाजप यांची युती होणार असल्याची चर्चा होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि भाजप नेत्यांच्या वारंवार होणाऱ्या भेटी या युतीच्या (MNS BJP Yuti) द्योतक आहेत. मात्र या सगळ्या चर्चांना पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. कारण नुकतीच मनसेची एक बैठक झाली. यात स्वबळावर निवडणूक लढण्याबाबत चर्चा झाली असल्याची माहिती आहे.

मनसेच्या आजच्या बैठकीत युती आणि आगामी निवडणुकीवर चर्चा झाली. यात राज ठाकरेंनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर, आता चिन्हही गोठवल्यानंतर उद्धव ठाकरेंना सहानुभूती मिळतेय, मात्र फायदा होणार नाही, असं राज ठाकरे म्हणाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जे सुरु आहे. ते योग्य नाही. लोकांमध्ये संभ्रम आहे. राज्यातील सध्याच्या राजकारणाला जनता वैतागली आहे, असंही राज ठाकरे म्हणाल्याची माहिती आहे.

‘आगामी निवडणुका स्वबळावर लढण्यासाठी सज्ज व्हा, कामाला लागा’, अशा सूचनाही राज यांनी मनसे कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.

भाजप नेते आणि ठाकरे भेट

मागच्या काही दिवसांपासून भाजप नेत्यांचं राज ठाकरेंच्या घरी येणं-जाणं वाढलंय. उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काही दिवसांआधी राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेटीसाठी गेले होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही शिवतीर्थवर जात राज ठाकरेंची भेट घेतली होती.

राज ठाकरे काही दिवसांआधी नागपूरच्या दौऱ्यावर गेले होते. तेव्हा त्यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या घरी जात भेट घेतली. तसंच नितीन गडकरी यांचीही त्यांनी भेट घेतली होती. या सगळ्या भेटींनंतर भाजप मनसे युतीची चर्चा होत होती पण आता या सगळ्यावर पडदा पडण्याची शक्यता आहे.