मनसे विधानसभेच्या किती जागा लढवणार, राज ठाकरे यांनी आकडा सांगितला; कुणाला बसणार फटका?

| Updated on: Aug 24, 2024 | 3:22 PM

आता विधानसभेत राज ठाकरे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. अखेर आता राज ठाकरे यांनी मनसेची विधानसभा निवडणुकीसाठी भूमिका काय असणार, याबद्दल भाष्य केले आहे.

मनसे विधानसभेच्या किती जागा लढवणार, राज ठाकरे यांनी आकडा सांगितला; कुणाला बसणार फटका?
Follow us on

Raj Thackeray On Vidhansabha Election Seats : राज्यातील विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. येत्या काही महिन्यात विधानसभा निवडणूक जाहीर होईल, असं म्हटलं जात आहे. त्यातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना अॅक्शन मोडवर आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र दौरा करताना दिसत आहेत. यावेळी ते अनेक आरोप प्रत्यारोप करतानाही दिसत आहे. तर काही जिल्ह्यातील दौऱ्यानंतर त्यांनी उमेदवारांची घोषणा करण्यासही सुरुवात केली आहे. आता राज ठाकरेंनी किती जागांवर लढणार हे स्पष्टपणे सांगितले आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. राज ठाकरे यांनी लोकसभेला पंतप्रधान नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यानंतर आता विधानसभेत राज ठाकरे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. अखेर आता राज ठाकरे यांनी मनसेची विधानसभा निवडणुकीसाठी भूमिका काय असणार, याबद्दल भाष्य केले आहे.

राज ठाकरे हे सध्या अमरावती, नागपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी राज ठाकरेंनी पत्रकारांशी संवाद साधला. “मनसेने 2009 मध्ये 230 ते 250 जागा लढवल्या होत्या. आता येत्या निवडणुकीत मनसे 200 ते 225 जागा लढवणार आहे. यासाठी आम्ही उमेदवारांची चाचपणी करत आहे”, असे राज ठाकरे म्हणाले. यामुळे आता सर्वच पक्षांच्या भुवया उंचावल्या आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, राज ठाकरेंचे आदेश

दरम्यान काही दिवसांपूर्वी मनसेने मुंबईत कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यावेळी राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, असं म्हटले होते. मी कुठल्याही पक्षाकडे जागा मागण्यासाठी जाणार नाही, कारण कुणाचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरत नाही. त्यामुळे आपल्या पक्षाची भूमिका काय असायला हवी, हेच मी तुम्हाला सांगू शकतो, असं राज ठाकरे म्हणाले होते.

यावेळी राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवरही टीका केली होती. लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या आघाडीला झालेलं मतदान हे मराठी माणसाचं नाही. लोकांना उद्धव ठाकरेंचा राग आहे. मराठी माणूस आपण रिंगणात कधी उतरतोय, याची वाट पाहतोय, असे राज ठाकरेंनी म्हटले होते.