मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची शॅडो कॅबिनेट अवघ्या चार दिवसांत ‘अॅक्टिव्ह मोड’वर गेली आहे. शॅडो कॅबिनेटकडून ठाकरे सरकारकडे पहिली मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मनसेने थेट पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनाच पत्र लिहिलं आहे. (MNS Shadow Cabinet First Demand)
मनसे सरचिटणीस आणि शॅडो कॅबिनेटमधील पर्यटन विभागाचे सदस्य हेमंत गडकरी यांनी आदित्य ठाकरेंना पत्र लिहिलं आहे. विदर्भातील व्याघ्र प्रकल्पाजवळ सर्वसामान्य पर्यटकांची निवास व्यवस्था अल्पदरात उपलब्ध करुन देण्याची मागणी पत्रातून करण्यात आली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी, गोंदिया जिल्ह्यातील सीमेवर नागझिरा, याचप्रमाणे निसर्गाचं वरदान लाभलेल्या नवेगाव बांध, इटियाडोह आणि बोदलकसा प्रकल्प, हाजरा फॉल पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येत आहेत. मात्र महागड्या आणि अपुऱ्या निवास व्यवस्थेमुळे पर्यटकांचा हिरमोड होत असल्याचा दावा गडकरींनी केला आहे.
‘विदर्भातील अभयारण्यांमध्ये वाढत असलेली पर्यटक संख्या लक्षात घेता महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या निवारा खोल्यांची संख्या वाढवावी. तसंच वाढती महागाई पाहता निवारा खोल्यांचे चढे दर कमी करावेत. जेणेकरुन सर्वसामान्य मध्यमवर्गीय पर्यटकांना त्याचा फायदा होईल.’ असं पत्रात लिहिलं आहे.
मनसेच्या शॅडो कॅबिनेटमध्ये पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे यांच्यावरही जबाबदारी देण्यात आली आहे. अमित ठाकरे यांना मराठी भाषा, पर्यटन, ग्रामविकास, वने आणि आपत्ती व्यवस्थापन या खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. म्हणजे एकप्रकारे अमित ठाकरे आपले चुलत बंधू आदित्य ठाकरे यांच्यावर नजर ठेवणार आहेत. (MNS Shadow Cabinet First Demand)
मला थेट संपर्क करा, शॅडो कॅबिनेटमध्ये वर्णी लावतो, राज ठाकरेंची खुली ऑफर
तुम्ही पक्षाचे पदाधिकारी नसलात, पण तुम्हाला एखाद्या विषयात काम करायची इच्छा असेल, तर त्यांनी माझ्याशी थेट संपर्क साधावा, मी तुम्हाला ‘शॅडो कॅबिनेट’ अर्थात प्रतिरुप मंत्रिमंडळाच्या कामात सहभागी करुन घेईन, असा खुला प्रस्ताव मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. मनसेच्या 14 व्या वर्धापन दिनानिमित्त नवी मुंबईत आयोजित सोहळ्यात शॅडो कॅबिनेटची घोषणा करण्यात आली होती.
सरकारवर वचक ठेवणारं, ते चुकलं तर त्यांचे वाभाडे काढणारं आणि चांगलं काम केलं तर त्याच कौतुकही करणारं आमचं ‘शॅडो कॅबिनेट’ आहे. पण….
तुमचं तर मागची ५ वर्ष सत्तेत राहून आपल्याच सरकारवर, सरकारचाच भाग बनून तुमचं ‘शॅलो कॅबिनेट’ चाललं होतं, हे विसरलात?
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) March 11, 2020
महाराष्ट्रातील विविध प्रश्नांसाठी आणि समाजगटांसाठी काम करणारं हे खातं आहे. सरकारचे वाभाडे जिथे काढायचे आहेत, तिथे वाभाडे काढा आणि जिथे सरकार चांगलं काम करेल तिथं त्यांचं अभिनंदन पण करा, अशा सूचनाही राज ठाकरेंनी दिल्या होत्या. शॅडो कॅबिनेटच्या प्रयोगाला यश येईल याची खात्रीही राज ठाकरेंनी व्यक्त केली होती. (MNS Shadow Cabinet First Demand)