मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची तयारी सुरु झाली आहे. महाआघाडीतील प्रमुख नेत्यांची मुंबईत बैठक झाली. यामध्ये मनसेला सोबत घेण्यासाठी सर्वांचंच एकमत झाल्याची माहिती आहे. लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर विधानसभा निवडणुकीत मात्र सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे हा सूर काँग्रेस राष्ट्रवादीसह स्वाभिमानीचे राजू शेट्टी आणि सपाचे आमदार अबू आझमी यांचाही होता.
राज ठाकरे यांना बरोबर घ्यावं अशी मागणी बैठकीत झाल्याची माहिती आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने मनसेला विरोध केला होता. दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला बरोबर घेण्यासाठी चर्चा करावी असंही मत बैठकीत मांडण्यात आलं. राज्यात धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र यावं अशी मागणी झाली.
विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महाआघाडीला लवकरात लवकर मूर्त रुप देण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. दरम्यान, याअगोदर राजू शेट्टी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. ही सदिच्छा भेट असल्याचंही राजू शेट्टी यांनी सांगितलं होतं. लोकसभा निवडणुकीत मनसेने भाजपविरोधात प्रचार केला होता. राजू शेट्टींच्या मतदारसंघातही राज ठाकरेंची सभा झाली होती.
लोकसभा निवडणुकीच्या अगोदर राज्यातील छोटे-मोठे 56 पक्ष भाजपविरोधात एकत्र आले होते. सर्व पक्षांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपविरोधात रणशिंग फुंकलं होतं. पण लोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपने 48 पैकी 41 जागा जिंकल्या. काँग्रेसला केवळ एक जागा मिळवता आली, तर राष्ट्रवादीने पाच जागांवर विजय मिळवला.