नागपूर : भाजपचा गड असलेल्या नागपूर जिल्ह्यात ग्राम पंचायत निवडणूक लढवण्याचा निर्णय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतला आहे. गाव पातळीवरुन संघटन मजबूत करण्यासाठी राज ठाकरे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे विदर्भातील मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. मनसेच्या एन्ट्रीमुळे नेमका कुणाचा फायदा होणार आणि कुणाला फटका बसणार, याचा फैसला 18 जानेवारीलाच होईल. (MNS to contest Gram Panchayat Election in Nagpur)
भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या नागपूर जिल्ह्यात 130 ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत. या सर्व निवडणुका लढवण्याचा निर्धार नागपूर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. गाव पातळीवरील संघटन मजबूत करण्यासाठी मनसे सध्या आक्रमक झाली आहे. मनसेच्या या निर्णयामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाल्याचं मनेचे नेते हेमंत गडकरी यांनी सांगितलं.
नागपूर जिल्ह्यात कुठल्या तालुक्यांत किती ग्रामपंचायतीत निवडणुका
तालुका – ग्रामपंचायतीची संख्या
काटोल – 03
नरखेड – 17
सावनेर – 12
कळमेश्वर – 05
रामटेक – 09
पारशिवनी – 10
मौदा – 07
कामठी – 09
उमरेड – 14
कुही – 25
नागपूर ग्रामीण – 11
हिंगणा – 05
(MNS to contest Gram Panchayat Election in Nagpur)
नागपूर जिल्ह्यातील उमरेड विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे 39 ग्रामपंचायतीत निवडणूक आहे. या विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांनी चांगली ताकद लावली आहे. गेल्या काही दिवसांपासून राजू पारवेंची तयारी सुरु आहे. भाजपनेही जोर लावला आहे, तर आता मनसेनेही कंबर कसली आहे. त्यामुळे ग्राम पंचायत निवडणुकीत मनसेच्या एन्ट्रीचा काय परिणाम होणार? याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.
राज ठाकरेंचे आदेश
राज्यातील महाविकास आघाडी, भाजप, वंचित बहुजन आघाडीपाठोपाठ आता मनसेनेही ग्रामपंचायत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निवडणुकीसाठी येत्या 23 डिसेंबरपासून उमदेवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्व जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्षांना आपल्या भागातील ग्रामपंचायत निवडणुकीत मनसेचा उमेदवार उभा करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
किती जागा लढवायच्या हे स्थानिक नेतृत्व ठरवेल: सरदेसाई
आम्ही ग्रामपंचायतीच्या निवडणुका संपूर्ण ताकदीनिशी लढवणार आहोत. त्यासाठी राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आदेश दिले आहेत. किती जागा लढवायच्या हे अजून ठरलेलं नाही. मात्र, स्थानिक नेतृत्व परिस्थिती पाहून निर्णय घेतील, असं मनसेचे नेते आणि माजी आमदार नितीन सरदेसाई यांनी सांगितलं. मनसे हा ग्रामीण भागापर्यंत पोहोचलेला पक्ष आहे. त्यामुळे या निवडणुकीत मनसेची ताकद अधोरेखित होईल, असंही ते म्हणाले. मात्र, राज ठाकरे हे ग्रामपंचायत निवडणुकीत प्रचार करणार की नाही हे अद्याप ठरलेलं नसल्याचंही त्यांनी सांगितलं.
शिवसेनेची मतं खाण्यासाठी मनसे मैदानात
दरम्यान, मनसेने ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवार देण्याचा निर्णय घेतल्याने त्याचे राजकीय अर्थही काढले जाऊ लागले आहेत. शिवसेनेच्या व्होटबँकेला छेद देण्यासाठी मनसे मैदानात उतरत असल्याचं बोललं जात आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत अवघ्या काही मतांनी विजय होत असतो. मनसेने प्रत्येक मतदारसंघात शे दोनशे मतं घेतली तरी त्याचा शिवसेनेला मोठा फटका बसून भाजपला फायदा होऊ शकतो, असं राजकीय जाणकार सांगत आहेत.
मनसे फॅक्टरचा फायदा कोणाला होणार आणि कुणाला फटका बसणार, याचा फैसला 18 जानेवारीला म्हणजेच मतमोजणीच्या दिवशीच होणार आहे. पण ग्रामपंचायत निवडणुकीत मनसेच्या एन्ट्रीने आणखी चुरस निर्माण झाली आहे.
संबंधित बातम्या:
सरपंचांची सोडत निवडणुकीनंतर, आधीची सोडत रद्द
तुमच्या ग्रामपंचायत निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम एका क्लिकवर
ग्रामपंचायत निवडणूक पूर्ण ताकदीने लढा, राज ठाकरेंचे जिल्हाध्यक्षांना आदेश
(MNS to contest Gram Panchayat Election in Nagpur)