पुणे: हर हर महादेव या सिनेमाचा (मुव्ही) वाद अजूनही सुरूच आहे. हा वाद काही थांबताना दिसत नाही. अनेक ठिकाणी या सिनेमाचे शो बंद पाडण्यात आले आहेत. स्वत: राष्ट्रवादीचे (एनसीपी) नेते जितेंद्र आव्हाड यांनी या सिनेमाला विरोध करत सिनेमाचे शो बंद पाडले. इतकेच नव्हे तर या सिनेमातील तथ्यांवर आक्षेप घेत ब्राह्मण महासंघानेही या सिनेमाला विरोध दर्शविला आहे. हा विरोध सुरू असतानाच मनसेने (एमएनएस) मात्र या सिनेमाची बाजू घेतल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. या सिनेमाचे शो रद्द करण्याचा प्रयत्न केल्यास खळ्ळखट्याक होईल, असा इशाराच मनसेने दिला आहे.
हर हर महादेव चित्रपटाला विरोध होत असून या सिनेमाचे शोज रद्द करण्यात येत आहेत. त्यामुळे मनसे आक्रमक झाली आहे. जर कोणी चित्रपट बंद करण्याचा प्रयत्न करणार असेल तर खळखट्याक होईल, असा इशारा मनसे सरचिटणीस अजय शिंदे यांनी दिला आहे.
राज ठाकरेंना विरोध करण्यासाठी चित्रपटाला विरोध करू नका, असं सांगतानाच मनसे पदाधिकारी आज पुन्हा शोज सुरू करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, काल मुंबईतील मनसे नेत्यांनी मुंबई-अहमदाबाद मार्गावर असलेल्या आयनॉक्स सिनेमा व्यवस्थापकांना हर हर महादेव सिनेमा तात्काळ सुरू करावा यासाठी पत्र दिले.
मनसे कामगार नेते, विधानसभा अध्यक्ष व नाविक सेना सरचिटणीस संदीप राणे यांच्या नेतत्वाखालील हे पत्र देण्यात आले. हा सिनेमा तात्काळ सुरू करण्यात यावा अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करू, असा इशारा यावेळी देण्यात आला.
राष्ट्रवादीने हर हर महादेव चित्रपटात गोंधळ घातल्या नंतर काल मनसेकडून खास शोचे आयोजन करण्यात आले होते. नागरिकांसाठी हा शो ठेवण्यात आला होता. हर हर महादेवच्या या विशेष शोला अमेय खोपकर देखील उपस्थित होते. यावेळी कोणताही गोंधळ होऊ नये म्हणून सिनेमागृहाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
जिथे जिथे शो बंद करण्याचा प्रयत्न केला जाईल तिथे तिथे आम्ही शो सुरू करू. हा चित्रपट सर्वांनी बघावा. राष्ट्रवादीने राडा नाही थिल्लरपणा केला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या नाकावरती टिच्चून आम्ही चित्रपट लावून दाखवलाय. त्यांना इतिहास माहीत नाही. अशा प्रकारे शो कोणी बंद करू शकत नाही, असा इशारा अमेय खोपकर यांनी दिला होता.