मुंबई : बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरोधात एल्गार पुकारलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मोर्चाची ‘मोर्चेबांधणी’ही चांगलीच सुरु केली आहे. मुंबईतील वर्सोवा भागात मनसेच्या वतीने बांगलादेशी घुसखोरांना इशारा देणारं पोस्टर (MNS Versova Poster) लावण्यात आलं आहे.
‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना (वर्सोवा विधानसभा) वर्सोव्यातील बांगलादेशी घुसखोरांना ‘मनसे’ इशारा, तुमच्या देशात निघून जा’ असं पोस्टरवर मराठीत लिहिण्यात आलं आहे. मनसेचे वर्सोवा विभाग अध्यक्ष संदेश देसाई आणि उपविभाग अध्यक्ष अशोक पाटील यांची पोस्टरवर नावं आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वात रविवार 9 फेब्रुवारीला दुपारी बारा वाजता मनसेचा मोर्चा निघणार आहे. पोलिसांनी मनसेला गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान या नव्या मार्गावरुन मोर्चा नेण्यास परवानगी दिली आहे. याआधी मोर्चाचा मार्ग मुंबईतील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानापासून (भायखळा) आझाद मैदानापर्यंत ठरवण्यात आला होता. मात्र मुंबई पोलिसांनी भायखळ्यातून मोर्चा काढण्यास नकार दिल्याने हा बदल केल्याचं सांगण्यात येत आहे.
भारत माझा देश आहे! #मनसे_महामोर्चा pic.twitter.com/aUst3XCEJz
— MNS Adhikrut (@mnsadhikrut) February 3, 2020
पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात हा मोर्चा असल्याचं राज ठाकरेंनी काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केलं होतं. देशाच्या इतर भागातून लोक देशात सरळ घुसखोरी करतात. त्यामुळे आपल्याला इतर देशांप्रमाणे कठोर व्हायला हवं. म्हणून पहिल्यांदा या देशात आलेले बांग्लादेशी आणि पाकिस्तानी मुस्लिम बाहेर काढले पाहिजेत. यासाठी माझा केंद्राला पूर्ण पाठिंबा आहे, असं मत राज ठाकरे यांनी पक्षाच्या पहिल्या अधिवेशनातील भाषणात व्यक्त केलं होतं.
मनेसेच्या मोर्चाला परवानगी देण्याच्या मुद्द्यावर स्वतः गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली होती. “राज ठाकरे यांनी मोर्चाला परवानगी मागितली आहे. त्यांना कोणत्या ठिकाणी परवानगी पाहिजे. यावर सर्व गोष्टींचा विचार करुन आम्ही निर्णय घेऊ. कायदा सुव्यवस्थेला कुठेही गालबोट लागायला नको, याचा सर्व विचार करुन त्यांना परवानगी देऊ.” असं अनिल देशमुख म्हणाले होते. (MNS Versova Poster)