मुंबई : तीन राज्यातल्या पराभवामध्ये मोदीलाटेसह मोदी जॅकेटचीही क्रेझ कमी झाल्याचं दिसत आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी सध्या सातत्याने वापरत असलेले लेदर हाफ जॅकेट काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आर्कषणाचा विषय ठरला आहे. मोदी जॅकेटला राहुल गांधींकडून उत्तर देण्याचा हा प्रयन्त आहे का? असा प्रश्न सध्या चर्चिला जातोय.
नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपद प्राप्त झाल्यानंतर मोदी यांच्या मोदी जॅकेटला अच्छे दिन आले. मोदींच्या वापरात असणारे हे जॅकेट अल्पावधीतच मोदी जॅकेट या नावाने प्रसिद्ध झाले आणि अगदी हा ट्रेंड जगभर दिसला. मात्र आता याच मोदी जॅकेटला राहुल गांधी यांच्याकडून लेदर हाफ जॅकेटच्या माध्यमातून उत्तर देण्याचा हा प्रयत्न असावा. सध्या पुणे शहरातील काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते थंडीची संधी साधून राहुल गांधींप्रमाणेच लेदर हाफ जॅकेटची फॅशन करू लागल्याचे चित्र दिसून येत आहे.
Modi Jacket Out … Rahul Jacket In ! #NewTrend #RahulJacket pic.twitter.com/Y0kYpnt4dI
— Satyajeet Tambe (@satyajeettambe) December 20, 2018
मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड येथील निवडणुकांमध्येही काँग्रेस नेत्यांच्या अंगावर हे जॅकेट प्रामुख्याने दिसल्याने राहुल जॅकेटचा ट्रेंड सुरू झाल्याचे दिसून येत आहे. सध्या राहुल गांधी यांच्या अंगावर दिसणारे लेदर हाफ जॅकेट हे मोदी जॅकेटला उत्तर असल्याचे खासगीत बोलले जात आहे. मध्य प्रदेशात खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांनी गेल्या वर्षभरापासून हे जॅकेट सातत्याने वापरल्याचे दिसून आले आहे. मात्र मोदींच्या जॅकेटला पर्याय नाही आणि असे जॅकेट घालून निवडणुका जिंकता येत नाहीत, अशी टीका आता भाजप नेते करतात.
दिवंगत पंतप्रधान पंडित नेहरू नियमित वापरत असलेल्या नेहरू जॅकेटचीही क्रेझ होती. नरेंद्र मोदींचे मोदी जॅकेट आणि राहुल गांधींचे लेदर हाफ जॅकेट लोकांवर किती प्रभाव पाडू शकणार ते येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल.