वैशाली, पाटणा : बिहारमध्ये महागठबंधनच्या सभेत जोरदार राडा झालाय. वैशाली जिल्ह्यातील मुरारपूर रातल मैदानात महागठबंधनची सभा आयोजित केली होती. या सभेला रालोसपा प्रमुख उपेंद्र कुशवाह येणार होते. सायंकाळी उशीर होऊनही कुशवाह आले नाहीत. स्थानिक राजद नेत्याने लोकांना कसं बसं सांभाळलं. पण नंतर उपस्थित तरुणांनी जोरदार राडा केला आणि संपूर्ण मैदानात ‘मोदी-मोदी’च्या घोषणा दिल्या.
यावेळी जमावाने व्यासपीठावर हल्लाबोल करत उपेंद्र कुशवाह यांचा फोटोही फाडला. शिवाय फोटो जाळण्याचाही प्रयत्न झाला. या तरुणांमध्ये अनेक अल्पवयीन मुलांचाही समावेश होता. अचानक परिस्थितीने रौद्ररुप धारण केलं आणि तुफान राडा सुरु झाला. दोन्ही बाजूकडून जोरदार मारहाण करण्यात आली, काठ्यांचाही मार काहींना देण्यात आला, ज्यात शेकडो खुर्च्या तुटल्या. शिवाय साऊंड बॉक्सही फोडण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन आमदार नंदकुमार राय, उपप्रमुख माशूम गौहर यांच्यासह अनेक नेते जखमी झाले. घटनास्थळावर तासंतास हा गोंधळ सुरुच होता. पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बळाचा वापर केला, पण जमावावर नियंत्रण मिळवता आलं नाही. या सर्व घटनेनंतर नंदकुमार राय यांनी एनडीएवर निशाणा साधत हे त्यांचं षडयंत्र असल्याचं म्हटलंय. पोलीस आता प्रकरणाचा तपास करत असून चित्रीकरणातून आरोपी शोधले जात आहेत.