नवी दिल्ली | 3 डिसेंबर 2023 : पाच राज्यात विधानसभेच्या निवडणूका झाल्यानंतर आज चार राज्याचे निकाल लागले. त्यात तीन राज्यात भाजपाचा मोठा विजय झाला आहे. ही लोकसभा निवडणूकीची रंगीत तालीम म्हटली जात असल्याने भाजपाने मोठा विजय उत्सव साजरा केला आहे. सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील पक्ष कार्यालयासमोर जनतेला अभिवादन करीत आभार मानले. मोदी यांनी नारी शक्तीसाठी सर्वाधिक काम केल्याचे म्हटले. नारी शक्तीचा विकास हा भाजपाच्या विकास मॉडेलचा स्तंभ असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. म्हणूनचे महिलांनी भाजपाला भरपूर आशीवार्द दिला. मी नम्रपणे देशातील महिलांना हेच सांगेन की तुम्हाला जी आश्वासनं दिली. ती शत प्रतिशत पूर्ण करू, ही मोदींची गॅरंटी आहे आणि मोदींची गॅरंटी म्हणजे गॅरंटी पूर्ण होण्याची गॅरंटी असेही मोदी यांनी यावेळी ठणकावून सांगितले.
भाजपाला सर्वाधिक विधानसभेच्या जागा असलेली तीन मोठी राज्ये मिळाली आहेत. त्यामुळे लोकसभेचा प्रवास सोपा झाला आहे. निवडणूक निकालासंदर्भात आभार मानताना मोदी यांनी आपण दहा वर्षांत केलेल्या कामाचा उल्लेख केला. भाजपाने दहा वर्षांत टॉयलेट, वीज, गॅस, पाणी, बॅंकेत खाती अशा सुविधा दिल्या. इमानदारीने काम केले. भाजप कुटुंब, समाजात महिलांची आर्थिक भागीदारी वाढवण्यासाठी रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी निरंतर काम करत आहे, हे महिला पाहत आहेत. नारी शक्तीचा विकास हा भाजपचा विकास मॉडेलचा स्तंभ आहे. म्हणूनच या निवडणुकीत महिलांनी भाजपाच्या विजयाची जबाबदारी आपल्या हातात घेतली होती. आपल्याला भरपूर आशीर्वाद दिल्याचे मोदी यांनी सांगितले.
मोदी पुढे म्हणाले की निवडणूक निकालाने एक गोष्ट स्पष्ट केली आहे. देशातील तरुणांना विकास हवा आहे. जिथे सरकारने तरुणांच्या विरोधात काम केलं ती सरकारे सत्तेच्या बाहेर गेली. राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणा सत्तेतून बाहेर पडले. ही सर्व सरकारे भ्रष्टाचारात पुढे होती. पेपर लीक आणि भरती घोटाळ्यात मग्न होती. त्याचा परिणाम असा झाला की सत्तेतील पक्ष सरकारमधून बाहेर आहेत. आज देशातील तरुणांमध्ये विश्वास वाढत आहे. भाजपच आपली आकांक्षा समजत असून आपल्यासाठी काम करत आहे, हे तरुणांना वाटतं. भाजपचं सरकार युवकांचं कल्याण पहाणारी आहेत, तरुणांना नवीन संधी देणारी आहेत असं या तरुणांना वाटतं असेही मोदी यावेळी म्हणाले.
कॉंगेसने आदिवासी समाजाला मागे ओढले. त्यामुळे आदिवासी समाज काँग्रेसच्या धोरणामुळे सात दशके मागे राहिला. त्यांना संधी दिली नाही. त्यांची लोकसंख्या दहा कोटी आहे. आज देशातील आदिवासी समाजही आपली मते उघडपणे मांडत आहेत. गुजरात निवडणुकीत आम्ही पाहिलं, ज्या काँग्रेसने कधी आदिवासींना विचारलं नाही त्यांनी काँग्रेसचा सफाया केला. हीच भावना आम्ही एमपी, छत्तीसगड आणि राजस्थानातही पाहिली. या राज्यातील आदिवासी बहुल भागात काँग्रेसचा सुफडा साफ झाला असल्याचे नरेंद्र मोदी यांनी सांगितले. आदिवासी समाज आज विकासासाठी आशावादी आहे. ही आशा केवळ आणि केवळ भाजप सरकारच पूर्ण करू शकते. हे त्यांना माहीत आहे. मी प्रत्येक राज्यातील भाजपच्या कार्यकर्त्याचं कौतुक करतो. भाजपाबाबतची तुमची निष्ठा, तुमचं समर्पण अतुलनीय आहे. डबल इंजिन सरकारचा मेसेज तुम्ही प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवला. त्याचा फायदा आज होत असल्याचे नरेंद्र मोदी यांनी म्हटले.