दत्ता कनवटे, औरंगाबादः औरंगाबादमध्ये एमआयएम (MIM) पक्षाच्या खासदारांवर चक्क पैशांची उधळण करण्यात आली. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनीच आयोजित केलेल्या कार्यक्रमात काही व्यक्तींनी त्यांच्या अंगावर नोटांची उधळण केली. शुक्रवारी औरंगाबादमध्ये (Aurangabad) कव्वालीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी खासदार जलील आणि त्यांच्या मुलावर पैशांचा पाऊस पाडण्यात आला. खासदार जलील यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
विरोधकांच्या नजरेतून ही बाब सुटलेली नाही. एक जबाबदार लोकप्रतिनिधी या नात्याने खासदाराकडून ही कृती नाकारता आली असती. मात्र कार्यक्रमातील व्यक्ती पैशांची उधळण करत होते तेव्हा खा. जलील यांनी कोणताही विरोध केला नाही. उलट या कृतीचा ते आनंद लुटत होते, अशी टीका सामान्यांमधूनही केली जातेय.
एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्यावर यापूर्वीदेखील अशा प्रकारे पैशांची उधळण करण्यात आली होती. तेव्हाही त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती. डिसेंबर २०२१ मध्ये तत्कालीन एमआयएमचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष अब्दुल समीर साजेद यांच्या भाचीचं लग्न होतं. यावेळी कव्वालीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या प्रसंगी नवरदेवाला भेटण्यासाठी व्यासपीठावर खा. जलील गेले असता त्यांच्यावर नोटांचा वर्षाव करण्यात आला होता.
तसेच कोरोना काळातदेखील खुलताबाद येथील कव्वालीच्या कार्यक्रमात खा. इम्तियाज जलील यांच्यावर पैशांची उधळण करण्यात आली होती. कोरोना प्रतिबंधक नियमांची पायमल्ली केल्या प्रकरणी आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
शुक्रवारी आमखास मैदानावरील कार्यक्रमात काही लोकांनी त्यांच्यावर नोटांची उधळण केली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून विरोधकांकडून खा. जलील यांच्यावर टीका करण्यात येत आहे.