औरंगाबाद: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या वक्तव्याविरोधात आज औरंगाबादमधील काँग्रेस (Aurangabad congress) कार्यकर्त्यांनी मोठं आंदोलन केलं. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Dr. Bhagwat Karad) यांच्या घरासमोर आंदोलन करणार असा इशारा काँग्रेस कार्यकर्त्यांनी काल दिला होता. त्यानुसार, आज शनिवारी सकाळीच शेकडो कार्यकर्ते क्रांती चौक येथे जमले होते. त्यानंतर हा मोर्चा केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड यांच्या घराकडे निघाला. मात्र पोलिसांनी त्यांना रस्त्यात अडवलं. दरम्यान आता या प्रकरणात काँग्रेसच्या तब्बल 120 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. क्रांती चौक पोलीस ठाण्यात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह काही नेत्यांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कल्याण काळे यांच्यासह तब्बल 120 जणांचा समावेश आहे.
दरम्यान, काल काँग्रेसने भाजपविरोधात हे निषेध आंदोलन करण्याचं घोषित केल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनीही याचा विरोध करण्याचं ठरवलं. त्यानुसार, डॉ. भागवत कराड यांच्या घरी शहरातील सर्व भाजप नेते आणि कार्यकर्ते जमले होते. काँग्रेसच्या या आंदोलनाला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजप कार्यकर्तेही शहरात एकवटले. मात्र भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते आमने-सामने येऊ नये, यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त केला होता. भागवत कराड यांच्या घराकडे निघालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी क्रांती चौकमध्येच अडवलं, पोलिसांनी अडवल्यानंतर काँग्रेसच्या वतीने क्रांती चौकातच आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या प्रकरणी आता काँग्रेसच्या 120 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी लोकसभेत बोलताना देशातील कोरोनाचा प्रसार होण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेस जबाबदार आहे, असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर काँग्रेस पक्षातून यावर तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसतर्फे करण्यात आली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात राज्यभरातील काँग्रेस कार्यकर्ते भाजप नेत्यांच्या घराबाहेर आणि कार्यालयाबाहेर आंदोलन करत आहेत. अनेक ठिकाणी भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते आमने सामने आल्याचे देखील पहायला मिळत आहे.