बंगळुरु : कर्नाटकमधील राजकीय पेच आणखी वाढल्याचे दिसत आहे. काँग्रेसचे आणखी 5 आमदार आपला राजीनामा स्वीकारला जात नसल्याची तक्रार घेऊन सर्वोच्च न्यायालयात पोहचले आहेत. आधीच काँग्रसचे 10 बंडखोर आमदार विधानसभा अध्यक्ष राजीनामा स्वीकारत नसल्याचे म्हणत सर्वोच्च न्यायालयात गेले होते. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावणाऱ्या आमदारांची संख्या 15 झाली आहे. बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यानंतर विरोधी पक्षनेते बी. एस. येडियुरप्पा यांनी सरकार अल्पमतात आल्याचा दावा केला आहे. तसेच आपण अविश्वास प्रस्तावासाठी तयार असल्याचेही म्हटले.
कर्नाटकचे विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांनी काँग्रेसच्या आमदारांचे राजीनामे अजूनही स्वीकारलेले नाहीत. त्यातच आज रोशन बेग यांच्यासह आणखी 5 काँग्रेस आमदारांनी आपले राजीनामे न स्वीकारल्याने सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. याआधीही 10 आमदारांनी याच मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावेळी न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना खडसावले होते. तसेच राजीनामे स्वीकारण्यासाठी वेळ ठरवून दिला होता. आता एकूण 15 आमदारांनी आपले राजीनामे त्वरीत स्वीकारले जावेत यासाठी सर्वोच्च न्यायालय गाठलं आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय आता काय भूमिका घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
दुसरीकडे विश्वासमत जिंकण्यासाठी काँग्रेस-जेडीएस आणि भाजपने आपआपल्या आमदारांना वेगवेगळ्या रिसॉर्टमध्ये ठेवले आहे. धर्मनिरपेक्ष जनता दलाने (जेडीएस) आपल्या 30 आमदारांना बंगळुरुमधील गोल्फशायर रिसॉर्टमध्ये ठेवले आहे. तर काँग्रेसने आपल्या 50 आमदारांना क्लार्क्स एक्झोटिका कन्वेंशन रिसॉर्टमध्ये ठेवले आहे. भाजपने आपल्या 105 आमदारांपैकी 80 आमदारांना येलहंका येथील रामाडा रिसॉर्टमध्ये ठेवले.
कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी आमदारांच्या राजीनाम्यानंतरही विधानसभेत विश्वासमत सिद्ध करण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर भाजपने आपल्या आमदारांना एकत्रित ठेवण्यासाठी प्रयत्न सुरु केले. या सर्व आमदारांनी कर्नाटकचे भाजप प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुरप्पा यांच्यासोबत जेवणही केले. येडियुरप्पा यांनी आपले सर्व आमदार एकत्रित असून अविश्वास प्रस्तावासाठी तयार असल्याचे म्हटले आहे.