मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली आहे. सर्वच पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. त्याचाच भाग म्हणून भाजपच्या नव्या आधुनिक मीडिया रुमचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी संकेत दिलेत की, सर्वच पक्षांमधले मोठी नेते भाजपमध्ये येण्यास उत्सुक असून पुढच्या काळात तुम्हाला ते कळेलच. राज्यात भाजपची स्थित अत्यंत मजबूत असून 2014 पेक्षाही युतीला जास्त जागा मिळतील, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. भाजप आणि शिवसेनेत कुठलेही मतभेत नाहीत. सर्वच नेते मतभेद विसरून कामाला लागले आहेत. भाजपची राज्यातली पहिली यादी लवकरच जाहीर करू असंही मुख्यमंत्री म्हणाले.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या आघाडीला पहिला मोठा धक्का देत अहमदनगरमध्ये विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखेंनी भाजपात प्रवेश केला. आता यानंतर भाजपने मोर्चा सोलापूर जिल्ह्याकडे वळवलाय. एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा बालेकिल्ला असलेला आणि हा बालेकिल्ला मजबूत ठेवणारे विजयसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव रणजित सिंह मोहिते पाटील भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. यानंतर अजून काही मोठे नेते भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती आहे.
भाजपने अजून उमेदवार यादी जाहीर केलेली नाही. “ही याद आज किंवा उद्या येईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. भाजपसाठी अनुकूल वातावरण आहे. 2014 ला मोदीजींच्या बाजूने जी लाट होती त्यापेक्षा मोठी लाट मला यावेळी पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात आम्हाला यश मिळेल आणि आम्ही नवा रेकॉर्ड करू. लोकांची मानसिकता मोदींचं सरकार आणण्याची झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आम्हाला निश्चित यश मिळेल,” असं मुख्यमंत्री म्हणाले.
रणजित सिंह पाटील यांच्या भाजप प्रवेशावर मुख्यमंत्र्यांनी सूचक वक्तव्य केलं. याबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला असता, आगे आगे देखो होता है क्या, असं उत्तर त्यांनी दिलं. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांनाही टोला लगावला. शरद पवार यांची समंजस अशी परिस्थिती आहे. त्याच्या पक्षात अनेक असमंजस आहेत, पण ते समंजसपणे बोलतील असं मला वाटतं, असं मुख्यमंत्री म्हणाले.
व्हिडीओ पाहा