मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतलीय. इतकंच नाही तर राज ठाकरे यांनी 3 मे पर्यंत महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi) मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी डेडलाईनही दिलीय. राज ठाकरे यांच्या मशिदींवरील भोंग्यांबाबतच्या वक्तव्याचे पडसाद आता राज्यभरात उमटताना पाहायला मिळत आहे. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (Popular Front of India) अर्थात पीएफआय या मुंब्रामधील एका मुस्लिम संघटनेनं मनसेला इशारा दिलाय. ‘हमको छेडेंगे तो हम छोडेंगे नहीं’ असं वक्तव्य पीएफ आयचे नेते अब्दुल मतीन शेखानी यांनी केलंय. तर पीएफआयच्या इशाऱ्याला आता मनसेकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलंय. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी मनसेच्या एका जरी कार्यकर्त्याच्या केसाला धक्का लागला तर महाराष्ट्रभर तांडव करु, असं देशपांडे यांनी म्हटलंय.
काही लोक वातावरण बिघडवण्याचं काम करत आहेत. काही लोकांना अजानची अडचण होतेय. काही लोकांना भोंग्यांची अडचण होतेय. काही लोकांना आपल्या मस्जिद आणि मदरशांची अडचण होत आहे. मी त्यांना एक सांगू इच्छितो, आम्हाला शांतता हवी आहे. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा एक नारा आहे की हर मजदूर हमारा है. सोबतच आमचा दुसराही नारा आहे की, ‘हमको छेडो नहीं, हमको छेडेंगे तो हम छोडेंगे नहीं’. येवढं लक्षात ठेवा की, एक मदरसा, एक मस्जिद, एकाही लाऊडस्पीकरवर तुम्ही हात लावण्याचा प्रयत्न केला तर सर्वात पुढे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया दिसेल, अशा शब्दात पीएफआयचे नेते अब्दुल मतीन शेखानी यांनी इशारा दिलाय.
एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सन्माननीय राज ठाकरे यांनी सांगितलं की, 3 मे पर्यंत मशिदींवरील भोंगे उतरवा. नाहीतर त्याच्यासमोर हनुमान चालीसा लावण्यात येईल, ही तर गोष्ट स्पष्ट आहे. भोंगे उतरवले गेले नाही तर त्या आदेशाचं पालन होईल. नंबर दोन आम्हाला महाराष्ट्रात कुठल्याही प्रकारचा ताण, तणाव, त्रास नको आहे. पण याचा अर्थ असा नाही की कुणीही उठेल आणि आम्हाला धमक्या देईल. माझी गृहमंत्र्यांना विनंती आहे की जो शहाणपणा ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला शिकवत आहेत. तोच शहाणपणा जितेंद्र आव्हाड आणि गृहमंत्री यांनी या पीएफआयसारख्या लोकांना शिकवावा, असं देशपांडे म्हणाले.
त्याचबरोबर आम्ही जे सांगतोय की 2005 च्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन करावं. मुंबई पोलीस कायद्यातील तरतुदीनुसार तुम्हाला 365 दिवस भोंगे लावता येणार नाहीत. हा कायदा आहे आणि या कायद्याचं पालन व्हावं. जे लोक कायद्याचं पालन न करता आम्हाला धमक्या देत असतील तर त्याची जबाबदारी शासनाची आहे. त्यांनी त्यांच्यावर कारवाई करावी. एक नक्की सांगतो की आमच्या एकाही मनसैनिकाच्या केसाला धक्का लागला तर महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशभर तांडव होईल आणि त्याची जबाबदारी शासनाची असेल, असा इशाराही देशपांडे यांनी दिलाय.
इतर बातम्या :