मुंबई: शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या बंगल्यावर ईडीने (ED) छापा मारल्यामुळे शिवसैनिक प्रचंड संतप्त झाले आहेत. काही शिवसैनिकांनी तर राऊत यांच्या बंगल्याच्या बाहेर जमून ईडी आणि भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली आहे. सूडबुद्धीने ही कारवाई करण्यात येत आहे. केवळ राऊत यांचा छळ करण्यासाठीच त्यांच्या घरावर छापा मारण्यात आल्याचा दावा शिवसैनिकांनी केला आहे. ज्या आमदारांनी शिवसेनेतून बाहेर पडून भाजपला पाठिंबा दिला. त्यांच्यावरील कारवाईचं काय झालं? कोणत्या वॉशिंग मशीनमध्ये टाकून या आमदारांना धुतलं? असा सवालही संतप्त शिवसैनिकांनी केला आहे. तर या कारवाईवर खासदार अरविंद सावंतही (arvind sawant) भडकले आहेत. ईडीला कारवाईसाठी आजचाच मुहूर्त कसा मिळाला? राज्यपालांच्या विरोधातील आक्रोश दाबण्यासाठीच ही कारवाई आहे का? असा सवाल अरविंद सावंत यांनी केला आहे. तसेच राजकीय सुडातून ही कारवाई करण्यात येत असल्याचा दावाही त्यांनी केला,
हा राजकीय सूड आहे. आज कसा मुहूर्त काढलाय़ राज्यपलाांनी महाराष्ट्राचा अपमान केला. मराठी माणसाचा अपमान केला. मराठी अस्मितेचा अपमान केला. वारंवार त्यांनी अपमान केला आहे. शिवाजी महाराजांपासून ते सावित्रीबाई फुलेंपर्यंत आणि कालचं राज्यपालांचं विधान हे संविधानाच्या विरोधात आहे. ती बातमी दाबली जावी म्हणून आजचा मुहूर्त शोधला का? का बरं ती बातमी आज येत नाही? राज्यपालांनी महाराष्ट्राचा अपमान केला. बातमी दाबली. कारण तुम्हाला ही बातमी दडपायची होती, असं अरविंद सावंत म्हणाले.
लोकसभेचं अधिवेशन सुरू आहे. अधिवेशन संपल्यावर मी तुम्हाला येऊन भेटतो असं राऊतांनी लेखी लिहून दिलं होतं. काय प्रॉब्लेम होता? पण आजचा मुहूर्त शोधला. कारण राज्यपालांच्या विधानावर महाराष्ट्रात असंतोष आहे. आताही जे जमलेत ना, तोच राग व्यक्त करायला जमले आहेत. आता दिवसभर ईडीचंच सुरू राहील. राज्यपालांची बातमी दाबली जाईल. राज्यपाल तुमचे लाडके आहेत का? असा सवालही त्यांनी केला.
तो मुलुंडचा भोंगा बोलतो ना ते सर्व लोक भाजपमध्ये गेले. त्यांच काय झालं पुढे विचारा त्याला. ईडीचा धाक दाखवत आहे. अर्जुन खोतकरांनी रडत सांगितलं. काल त्यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून सांगितलं. मला जावं लागेल. माझं कुटुंब हैराण आहे. तुम्ही लोकांना सतवून सतवून नेत आहात. महाराष्ट्रात फक्त मराठी माणसंच भ्रष्टाचारीच आहे का? की केवळ महाराष्ट्रच भ्रष्टाचारी आहे का? आम्ही लोकशाही पद्धतीने निदर्शने करणार आहोत. महाराष्ट्राचा अपमान मराठी माणसं सहन करणार नाहीत. भाजपमध्ये करंटी माणसे आहेत. कर्नाटकात शिवाजी महाराजांचं अपमान झाल्यावर इथल्या मुख्यमंत्र्यांने ती छोटी गोष्ट असल्याचं सांगितलं होतं, अशी टीका त्यांनी केली.