भोपाळ : तब्बल 15 वर्षानंतर एखाद्या राज्याचा प्रमुख म्हणून पद सांभाळल्यानंतर त्या पदावरुन पायउतार होणं काय असतं त्याचा अनुभव मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी घेतलाय. शिवराज सिंह यांनी राज्यपालांकडे राजीनामा सोपवत सत्तास्थापनेसाठी भाजप दावा करणार नसल्याचं स्पष्ट केलंय. सर्वात मोठा पक्ष काँग्रेस ठरल्यामुळे आपण सत्तेचा दावा करणार नाही, असं ते म्हणाले.
मध्य प्रदेशात सत्ता स्थापन करण्यासाठी 230 पैकी 116 जागांची गरज आहे. काँग्रेसला 114, भाजपला 109 जागा मिळाल्या आहेत. यामध्ये प्रत्येकी एक-एक जागा असलेल्या बसपा आणि सपाची महत्त्वाची भूमिका आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी बसपा आणि सपाने काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे काँग्रेसचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झालाय.
शिवराज सिंह हे गेल्या 15 वर्षांपासून मुख्यमंत्री होते. सलग 15 वर्ष त्यांनी सत्ता अबाधित ठेवली आणि यावेळी अवघ्या सात जागांमुळे त्यांना सत्ता गमवावी लागली. मध्य प्रदेशातल्या जनतेचा सरकारविरोधात रोष असला तरी वैयक्तिक रुपात शिवराज सिंह यांच्याविरोधात कुणाचाही रोष नसल्याचं बोललं जातं. त्यामुळेच शिवराज सिंह यांचं सिंहासन आजपर्यंत अबाधित होतं. पण अखेर काँग्रेसने शिवराज सिंह यांची सद्दी संपवली आहे.
राजीनामा दिल्यानंतर भावूक झालेल्या शिवराज सिंह यांनी एका कवितेतून आपल्या भावना व्यक्त केल्या. “ना हार में, ना जीत मे, किंचित नही भयभित मैं, कर्तव्य पथ पर जो भी मिले, ये भी सही वो भी सही” या ओळीतून शिवराज सिंहांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. शिवाय मी आता मुक्त असल्याचंही ते म्हणाले आणि पराभवाची जबाबदारीही स्वीकारली.
मध्य प्रदेशच्या सत्तेचा इतिहास
मध्य प्रदेशात गेल्या 15 वर्षांपासून भाजपची सत्ता असली तरी सर्वाधिक काळ सत्ता ही काँग्रेसने उपभोगली आहे. 1 नोव्हेंबर 1956 ला मध्य प्रदेशची स्थापना झाली आणि त्यानंतर काँग्रेसची सत्ता आली. ही सत्ता 1967 पर्यंत म्हणजे अकरा वर्ष कायम होती. त्यानंतर मधल्या काळात समयुक्त विधायक दल या पक्षाची सत्ता आली.
1972 ला सत्तेची चावी पुन्हा काँग्रेसकडे आली, मधल्या काळात जनता दलकडेही सत्ता गेली आणि काँग्रेसने 1985 ला मोठा विजय मिळवला. 1990 पर्यंत काँग्रेसची सत्ता राहिली. त्यानंतर भाजपने सत्ता मिळवली, पण भाजपचं हे सरकार जास्त काळ टिकलं नाही आणि दोन वर्षातच राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. केंद्रात सत्ता काँग्रेसची होती.
डिसेंबर 1993 मध्ये राष्ट्रपती राजवट संपल्यानंतर काँग्रेसने सत्ता मिळवली. ही सत्त सलग दहा वर्षे काँग्रेसकडे राहिली आणि नंतर भाजपने पुन्हा एंट्री केली. काँग्रेस नेते दिग्विजय सिंह हे सलग दहा वर्ष मुख्यमंत्री होते. भाजपने विद्यमान केंद्रीय मंत्री उमा भारती यांच्या नेतृत्त्वात 2003 ला सत्ता मिळवली. त्या नंतर पदावरुन पायउतार झाल्या आणि मुख्यमंत्री झाले बाबुलाल गौर. एक वर्षातच सत्तेची सूत्र शिवराज सिंह चौहान यांच्याकडे गेली. शिवराज सिंह यांनी 15 वर्ष सत्ता टिकवली पण अखेर त्यांना यावेळी थोडक्यात सत्ता गमवावी लागली.