दत्ता कनवटे, औरंगाबादः भाजपाला या देशात हुकुमशाही हवी आहे. लोकसभा खासदारांपैकी (Loksabha MP) कुणीही त्यांच्या निर्णयांविरोधात आवाज उठवू नये, अशीच त्यांची इच्छा आहे. मी नेहमी खरं बोलतो, त्यामुळे मला आधी टार्गेट (Target) करण्यात येतंय, असं वक्तव्य औरंगाबादचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी केली आहे. भाजपाच्या मिशन 144 अंतर्गत आज औरंगाबादेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची सभा होत आहे. या पार्श्वभूमीवर खा. जलील यांनी ही प्रतिक्रिया दिली.
जे पी नड्डा यांनी आपल्या भाषणात औरंगाबादच्या समस्या आणि विकासावरही बोलावं, असा सल्ला त्यांनी दिलाय. ते म्हणाले, ‘ लोकांसाठी काम करणं हे माझं काम आहे. या देशात कोणताही विरोधी आवाज नसावा, अशी भाजपची इच्छा असते. त्यांना हुकुमशाही पाहिजे. लोकसभा मतदारसंघांमधून भाजपाला विरोध करणारे कुणीही खासदार तयार होऊ नयेत, अशी त्यांची भूमिका आहे. मी खरं बोलतो, त्यामुळे कदाचित सर्वात आधी मला टार्गेट करण्यात येतं, त्यामुळेच आज ते औरंगाबादेत येत आहेत.
येत्या 2024 मधील लोकसभा निवडणुकांसाठी भाजपने प्रचार मोहीम राबवायला सुरुवात केली आहे. ज्या ठिकाणी भाजपचा खासदार नाही, अशा देशभरातील 144 ठिकाणी आधी प्रचाराचा धडाका सुरु आहे. याच मालिकेत आज चंद्रपूर आणि औरंगाबादेत भाजपच्या सभा होत आहेत. चंद्रपुरातही काँग्रेसचे खासदार आहेत तर औरंगाबादेत एमआयएमचे खा. इम्तियाज जलील आहेत. हाच मतदारसंघ भाजपने टार्गेट केल्याचं आजच्या आयोजनावरून दिसून येतंय.
औरंगाबादमधील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या भव्य ग्राउंडवर जे पी नड्डा यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. मराठवाड्यातील दिग्गज भाजप नेत्यांना आमंत्रण देण्यात आले आहे. केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
त्याआधी जे पी नड्डा चंद्रपुरात दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आदी नेते दौऱ्यात आहेत.
मराठवाड्यात भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांची सभा असूनही पंकजा आणि प्रीतम मुंडे या भगिनींना कार्यक्रमाचं निमंत्रण न मिळाल्याने पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलंय.