देवेंद्र फडणवीस सरकारवर भ्रष्टाचाराचा पहिला डाग?

| Updated on: Jun 06, 2019 | 6:05 PM

बिल्डरला फायदा देण्यासाठी प्रकाश मेहता यांनी नियम बाजूला ठेवून एफएसआय अन्यत्र वापरास मंजुरी दिल्याचा आरोप आहे. लोकायुक्तांकडून झालेल्या चौकशीत प्रकाश मेहतांनी अधिकारांचा वापर करुन बिल्डरला फायदा करुन दिल्याचा ठपका ठेवण्यात आल्याची माहिती आहे. तर प्रकाश मेहतांनी हे आरोप फेटाळले आहेत.

देवेंद्र फडणवीस सरकारवर भ्रष्टाचाराचा पहिला डाग?
Follow us on

मुंबई : ऐन पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता अडचणीत येण्याची शक्यता आहे. प्रकाश मेहतांवर मुंबईतील ताडदेवमधल्या एम. पी. मिल कम्पाऊंड येथील एसआरए प्रकल्पात एफएसआय घोटाळ्याचा आरोप आहे. बिल्डरला फायदा देण्यासाठी प्रकाश मेहता यांनी नियम बाजूला ठेवून एफएसआय अन्यत्र वापरास मंजुरी दिल्याचा आरोप आहे. लोकायुक्तांकडून झालेल्या चौकशीत प्रकाश मेहतांनी अधिकारांचा वापर करुन बिल्डरला फायदा करुन दिल्याचा ठपका ठेवण्यात आल्याची माहिती आहे. तर प्रकाश मेहतांनी हे आरोप फेटाळले आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, एमपी मिल कंपाऊंड प्रकरणात प्रकाश मेहता यांच्या भूमिकेवर सवाल उपस्थित करण्यात आलाय. लोकयुक्त एम. एल. तहलियानी यांनी ताशेरे ओढले आहेत. या प्रकरणात प्रकाश मेहतांचा कारभार पारदर्शी नाही, असा लोकायुक्तांचा अहवाल असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. येत्या पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे. कारण, विरोधकांनी प्रकाश मेहतांच्या राजीनाम्याशिवाय सभागृह चालू देणार नाही, असा इशारा दिलाय.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय लागू होण्याआधीच त्याला स्थगिती दिली होती. पण अधिकारांचा गैरवापर करुन निर्णय घेतल्याचा ठपका प्रकाश मेहतांवर आहे. “मुख्यंत्र्यांना याबाबतची कल्पना नव्हती, फाईलवर चुकून तसा शेरा मारण्यात आला,” अशी कबुली प्रकाश मेहता यांनी लोकायुक्तांकडे दिली आहे.

मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

लोकायुक्तांचा अहवाल आलेला असून त्यावर विचार होईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय. लोकायुक्तांच्या अहवालाचा एटीआर याच अधिवेशनात मांडला जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. शिवाय गृहितकांच्या आधारावर बातम्या देणंही चुकीचं असल्याचं ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या या प्रतिक्रियेअगोदरच विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. एकूणच, या मुद्द्यावर आगामी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

VIDEO :