बीड : मोदी सरकारने शेतकऱ्यांना न्याय तर दिलाच आहे मात्र त्याच बरोबर पैसा, त्यांच्या उत्पादनाला हमीभाव आणि शेतकऱ्यांची सुरक्षा देण्यात मोदी सरकार यशस्वी ठरले आहे, अशा शब्दात खासदार प्रीतम मुंडे यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या तथा खा. सुप्रिया सुळे यांना टोला लगावला. (Mp Pritam Mundhe Reply NCp Supriya Sule)
भाजपचे आज (शुक्रवार) राज्यभर शेतकरी संवाद अभियान सुरु आहे. या अभियानाअंतर्गत भाजपचे विविध नेते राज्यभर तसंच देशभरात कार्यक्रम घेऊन कृषी कायद्यांचं महत्त्व पटवून देत आहेत. बीडमधल्या संवाद अभियानामध्ये सहभागी झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रीतम मुंडे यांनी सुप्रिया सुळेंना टोला लगावला.
पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांच्या खात्यात आज पैसे वर्ग केल्यानंतर खा. सुप्रिया सुळे यांनी पैसा नको शेतकऱ्यांना न्याय हवा अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. सुप्रिया सुळे यांच्या याच वक्तव्यावर बोलताना प्रीतम मुंडेंनी त्यांचा समाचार घेतला.
शेतकरी आंदोलनाला आज 30 दिवस पूर्ण झाले तरी शेतकऱ्यांचं म्हणणं केंद्र सरकार ऐकून घेत नसल्याने राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला आहे. हे सरकार शेतकऱ्यांचा मान करत नाही. सर्व काही पैशाने विकत घेता येत नाही. शेतकऱ्यांना पैसे नकोत. न्याय हवा आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे.
“केंद्रातील सरकार असंवेदनशील आहे. गरीब शेतकऱ्यांचा हे सरकार सन्मान करत नाही. शेतकऱ्यांवर अन्यायच करत आहे. जे धोरण सरकारने आणलं आहे. त्यावर योग्य चर्चा करण्याची गरज आहे, असं सांगतानाच देशात अस्वस्थता वाढत आहे. शेतकरीही अस्वस्थ आहेत. त्यांना पैसे नको आहेत. त्यांना न्याय हवा आहे. सर्व काही पैशाने विकत घेता येत नाही. माणसाचा स्वाभिमान तर नाहीच नाही”, असं सुप्रिया म्हणाल्या.
मोदी सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलंय आणि नेहमीच राहील. शेतकऱ्याला त्याचा मालाचा योग्य मोबदला देण्यासाठी आणि शेतीचा मालक करण्यासाठी मोदींनी कृषी कायदे आणले मात्र विरोधक या कायद्यांबद्दल खोटा प्रचार करुन शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करत आहेत”, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
“मोदी सरकारचे कृषी कायदे म्हणजे शेतकऱ्यांना संरक्षण देणारे कृषी कायदे आहेत. सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांचा विरोधकांनीअभ्यास करावा. कंत्राटी शेती करताना काही वाद झाले तर शेतकऱ्यांना कोर्टात जाता येणार आहे, हे या कायद्यात आहे. तसंच एमएसपी कुठेही रद्द होणार नाही, बाजार समिती बरखास्त केल्या जाणार नाही, हे या कायद्यात असूनही विरोधक शेतकऱ्यांना खोटं सांगून भडकवण्याचं काम करत आहेत”, अशी टीका फडणवीसांनी यावेळी केली.
(Mp Pritam Mundhe Reply NCp Supriya Sule)
संबंधित बातम्या