नवी दिल्लीः शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे यांच्याकडून एका ज्येष्ठ नेत्याला धमक्या येत असल्याची तक्रार राहुल शेवाळे यांनी केली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे यांच्याकडून या नेत्याला ब्लॅकमेल करण्यात येतंय, असा आरोपही करण्यात आलाय. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राहुल शेवाळे यांनी पत्र पाठवलं असून त्यात गंभीर आरोप करण्यात आले आहेत. कुप्रसिद्ध गुंड डी के राव यांच्या मदतीने संबंधित ज्येष्ठ नेत्याला धमकावलं असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी राहुल शेवाळे यांनी केली आहे.
राहुल शेवाळे यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे यासंदर्भात तक्रार केली आहे. तसं पत्र त्यांनी लिहिलंय. त्यात म्हटलंय….
एका ज्येष्ठ नेत्यासोबत 2007 मध्ये लग्न करूनही 2011 साली त्याच्या विरोधात लैंगिक शोषणाची तक्रार केली. त्यानंतर सदर नेत्याला ब्लॅकमेल केल्याचा आरोपही राहुल शेवाळे यांनी केला आहे. एवढच नाही तर या नेत्याकडून घर, वडिलांचा दवाखान तसेच दुकानांचं फर्निचर करून घेतल्याचा आरोपही शेवाळे यांनी केलाय.
विधानपरिषद आमदार मनीषा कायंदे यांच्याकडून ब्लॅकमेलिंग आणि धमक्यांसाठी गुंड टोळीचा वापर होत आहे. या प्रकाराची चौकशी व्हावी, अशी विनंती फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे.
अभिनेता सुशांतसिंग राजपूत आणि त्याची मॅनेजर दिशा सालियान मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरेंचा काही संबंध आहे का, हे तपासून पाहण्यासाठी या केसची पुन्हा एकदा चौकशी व्हावी, अशी मागणी राहुल शेवाळे यांनी केली. त्यानंतर विधानसभेत सदर प्रकरणी एसआयटी चौकशी व्हावी, अशी मागणी सत्ताधाऱ्यांनी लावून धरली. या मागणीसाठी अनेकवेळा सभागृह तहकूब करण्यात आलं. अखेर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी SIT चौकशीचे आदेश दिले.
दरम्यान, या गदारोळात गुरुवारी साकिनाका पोलीस स्टेशनमध्ये राहुल शेवाळे यांच्याविरोधात एका महिलेने अत्याचार केल्याची तक्रार दाखल केल्याचंही वृत्त आहे.
तिला भारताबाहेर जावं लागलं आहे. ती मुंबई पोलिसांना भेटण्यास इच्छुक आहे, मात्र मुंबईत तिला येऊ दिलं जात नाहीये. त्यामुळे पीडितेला संरक्षण देण्यात यावे, यासंदर्भातलं पत्र मनिषा कायंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवल्याचंही कायंदे यांनी काल सांगितलं.
दरम्यान, मनिषा कायंदे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे राहुल शेवाळेंविरोधात तक्रार केली. त्यानंतर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्याविरोधात एसआयटी चौकशीचे आदेश राज्य सरकारला दिले.