मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या आघाडीच्या चर्चेचं गुऱ्हाळ अजून सुरुच आहे. चार जागांवर आघाडीची चर्चा सुरु आहे. तर त्यातच आघाडीत येण्यासाठी इच्छुक असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आघाडीत न जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी हे त्यांच्या स्वतःसह नऊ जागांवर उमेदवार देणार असल्याचं निश्चित मानलं जातंय.
जागावाटपावरुन आघाडीची चर्चा थांबल्याची माहिती आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना हातकणंगले, कोल्हापूर, माढा, सांगली, वर्धा, बुलडाणा, शिर्डी, परभणी आणि औरंगाबादमध्ये उमेदवार देण्याची शक्यता आहे. एकीकडे भारिपचे प्रकाश आंबेडकर 12 जागांवर अडून आहेत. तर स्वाभिमीनीचीही काही ठराविक जागांची मागणी आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे.
राजू शेट्टी आणि काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यात गेल्या काही दिवसांपासून आघाडीसाठी चर्चा सुरु आहे. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीतच अजून चार जागांचा तिढा सुटायचा बाकी आहे. येत्या दोन ते चार दिवसात हा तिढा सुटेल, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पुण्यात सांगितलं. पण त्यापूर्वीच स्वाभिमानी बाहेर पडण्याची शक्यता आहे.
भारिपचे प्रकाश आंबेडकर यांच्याशीही काँग्रेस आणि राष्ट्रवादीने चर्चा केली. पण भारिप 12 जागांवर ठाम आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधल्या इच्छुकांची गर्दी पाहता, आघाडीकडून 12 जागा सोडण्याची कोणतीही शक्यता दिसत नाही आणि प्रकाश आंबेडकर एकही जागा कमी घेण्यासाठी तयार नाहीत. त्यामुळे भारिप आणि स्वाभिमानीला सोबत घेण्यासाठी आघाडीची दमछाक होणार हे निश्चित झालंय.
आघाडीत स्वाभिमानीचं महत्त्व काय?
गेल्या दोन टर्मपासून हातकणंगले हा राजू शेट्टींचा बालेकिल्ला बनलाय. पश्चिम महाराष्ट्रात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मतदार मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे उमेदवार निवडून आला नाही तरीही स्वाभिमानीची मतं विभागल्यामुळे एखादा उमेदवार मात्र नक्कीच पडू शकतो. त्यामुळेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे स्वाभिमानीली सोबत घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत. शिवाय बुलडाण्यातून स्वाभिमानीचे रवीकांत तुपकर हे इच्छुक आहेत. राज्यातल्या काही ठराविक मतदारसंघांमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मतदारवर्ग आहे.