मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. त्याची चौकशी झाली पाहिजे. शरद पवार यांनी तीच मागणी केली आहे. आम्ही पवारांच्या या भूमिकेशी सहमत आहोत. राष्ट्रवादीने भ्रष्टाचार केला असेल, जो मंत्री भ्रष्टाचारी आहे त्याची चौकशी झालीच पाहिजे. सेंट्रल एजन्सी आणि स्टेट एजन्सीकडून या भ्रष्टाचाराची चौकशी केली पाहिजे, असं सांगतानाच देश बुडव्यांच्या हाती महाराष्ट्र गेल्याने राज्य सरकार बरखास्त करा, अशी मागणीच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.
पंतप्रधान मोदींनी भोपाळमध्ये राष्ट्रवादीवर जोरदार तोफ डागली. देश बुडवणाऱ्यांपासून सावध राहा असं त्यांनी सांगितलं. आर्थिक गुन्हेगार असं त्यांना म्हणायचं असेल. ज्यांनी देशाचा पैसा लुटला, बँका बुडवल्या हे सर्व देश बुडवे आहे. पण त्यातील काही देश बुडव्यांना भाजपनं सोबत घेतलं आणि मंत्रीपदाची शपथ दिली आहे. महाराष्ट्राचं सरकार देशबुडव्यांच्या हाती गेलं आहे. पंतप्रधान म्हणतात त्याप्रमाणे हे सरकार बरखास्त करा किंवा या देश बुडव्यांवर पंतप्रधान सांगतात त्याप्रमाणे कारवाई केली पाहिजे, अशी मागणी संजय राऊत म्हणाले.
पंतप्रधान या देश बुडव्यांवर कारवाई करणार नाही. भाजपचे राज्यातील नेते या देश बुडव्यांची पूजा करत आहेत. हे ढोंग आहे. 70 हजार कोटीचा सिंचन घोटाळा कुणी काढला? पंतप्रधानांनीच ना. देश बुडव्यांच्या हाती अर्थ खातं जाणार असेल तर त्याचं उत्तर पंतप्रधानांनी दिलं पाहिजे. देश बुडवे हे आर्थिक गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर एफआयआर दाखल झाला आहे. अन् त्यांच्याच हाती तिजोरी दिली जात आहे, असा हल्ला त्यांनी चढवला.
संपूर्ण देशात प्रादेशिक पक्षांना संपवण्याचं काम भाजपने सुरू केलं आहे. हे भाजपचं षडयंत्र आहे. त्यामुळे पक्ष फोडणं, लोकांना खरेदी करणं, आपल्या पक्षात आणणं आणि स्वच्छ करणं हे सुरू आहे. हे षडयंत्र आहे. पवारांनी सांगितलं ही देशाची भावना आहे, असंही ते म्हणाले.
काँग्रेसही लूट आणि झूठची दुकान असल्याचं पंतप्रधानांनी राजस्थानमधील सभेत म्हटलं होतं. त्यावरूनही राऊत यांनी मोदींवर टीका केली. लूट आणि झूठ की दुकान क्या है हे पंतप्रधानांनी महाराष्ट्रात येऊन पाहावं. तुम्ही काँग्रेसबद्दल बोलत आहात ते चुकीचं आहे. चुकून मोदींनी काँग्रेसचं नाव घेतलं असेल. ते स्वत: बद्दल बोलत असेल. लूट आणि झूठची दुकानं काँग्रेसची नव्हे भाजपची आहे, अशी टीका त्यांनी केली.
पश्चिम बंगालच्या हिंसाचाराला भाजप जबाबदार आहे. पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार व्हावा असं भाजपला वाटतं. मणिपूरमध्येही त्यांचं सरकार आहे. सीबीआय, एनआय तुमची आहे. ईडी तुमची आहे. करा ना चौकशी. पण तुम्ही राजकीय विरोधकांची चौकशी करत आहात. आता अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ आणि छगन भुजबळ यांची चौकशी बंद होईल. आता टीएमसी, आप, शिवसेना आणि एआयडीएमकेची चौकशी होईल, असा टोला त्यांनी लगावला.