सातारा : शाळेत जाण्यासाठी किंबहुना शिक्षणाचा हक्क (Right to education) बजावण्यासाठी सातारा जिल्ह्यातील मुला-मुलींना होडीतून जीवघेणा प्रवास (Travel by boat) करावा लागत असल्याची बातमी टीव्ही 9 मराठीने दाखवली होती. शाळेत जाण्यासाठी सातारा जिल्ह्यातील काही मुली स्वत: होडी वल्हवून कोयना धरण पार करावं लागत असल्याचं चित्र पाहायला मिळालं. या चित्रामुळे सरकारच्या शिक्षण धोरणातील फोलपणा पुन्हा एकदा समोर आला. त्यानंतर सरकार खडबडून जागं झालं आहे. सातारा जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले सातारा जिल्हाधिकारी यांनी या मुलींना फायबर बोटीची व्यवस्था केली आहे. मात्र अद्याप ती बोट उपलब्ध झाली नसल्यामुळे खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी इंजिन बोटीची व्यवस्था करुन दिली आहे.
सातारा जिल्ह्यातल्या जावली तालुक्यातील खिरखंडी येथील मुलींचा शिक्षणासाठी जीवघेणा संघर्ष संपूर्ण महाराष्ट्राने टीव्ही 9 मराठीच्या माध्यमातून पाहिला होता. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयानेही त्याची दखल घेतली होती. यानंतर साताऱ्याचे माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक सुहास राजेशिर्के यांनी सर्व मुलींना लाईफ जॅकेटची व्यवस्था केली. या सर्व घडामोडीनंतर सातारा जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले. सातारा जिल्हाधिकारी यांनी या मुलींना फायबर बोटीची व्यवस्था केली. मात्र, ती मदत अजूनही उपलब्ध झाली नसल्यामुळे शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि कल्याण-डोंबिवलीचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी खिरखंडी या ठिकाणी भेट देऊन त्या मुलींची व गावातील कुटुंबांची विचारपूस केली. त्यानंतर तातडीने त्यांना ये जा करण्यासाठी इंजिन बोटीची व्यवस्था केली आहे.
सोमवार सुट्टी असल्याने आज मंगळवारपासून या मुलींना यांत्रिक होडीच्या माध्यमातून आता नदीवरुन ये-जा करणे सोयीचे होणार आहे. या मुलींनी यांत्रिक बोटीची व्यवस्था झाल्याने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे तसंच एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. या शाळकरी मुलांना आणि त्यांच्या पालकांना कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास सर्व प्रकारची मदत शिंदे कुटुंबियांकडून करण्यात येईल, याबाबतची खात्री श्रीकांत शिंदे यांच्याकडून देण्यात आली. खिरखंडी येथील विद्यार्थीनी आणि त्यांच्या पालकांनी एकनाथ शिंदे तसेच श्रीकांत शिंदे यांचे आभार मानले आहेत.
दरम्यान, जावली तालुक्यातील विद्यार्थी-विद्यार्थीनींचा असलेला जीवघेण्या प्रवासाची न्यायालयाने दखल घेतली होती. न्यायालयाने असंही निरीक्षण नोंदवलं आहे की ‘बेटी बचाव, बेटी पढाओ’ या घोषणेचा उद्देश साध्य करायचा असेल तर मुलींना शिक्षणासाठी योग्य वातावरण देणं आवश्यक आहे. ज्यामुळे या मुलींना सुरक्षितपणे शाळेत येण्या जाण्यासाठी सोईसुविधा उपलब्ध होणार आणि शिक्षणासाठी योग्य परिस्थिती निर्माण होईल.
सातारा जिल्ह्याच्या जावली तालुक्यातील व्याघ्र प्रकल्पात खिरखंडी गावाचा समावेश होतो. या भागात सकाळी 9 वाजता शाळा सुरू होते. त्यासाठी सकाळी 8 वाजता गावातील मुली शाळेला जायला निघतात. त्यांचा हा प्रवास होडीनं सुरू होतो. सुमारे अर्धा तास वेगानं वाहणार्या वार्याचा सामना करत या मुली होडी चालवत कोयनेच्या दुसर्या तीरावर जातात. तिथे होडी थांबवून पुढे सुमारे 4 किलोमीटर काट्याकुट्यांतून आणि किर्र जंगलातून पायपीट करत दीड तासानंतर ‘अंधारी’ या गावात त्यांची शाळा आहे.
इतर बातम्या :