सिंधुदुर्ग : ज्याचं राजकीय आयुष्यच मेवा लूबाडण्यात गेलं त्या नारायण राणेंनी अनिल परब किंवा महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्याचं धारीष्ठ करू नये, असं म्हणत शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी राणेंवर पलटवार केलाय. मुंबईचे निलंबित पोलीस अधिकारी सचिन वझे यांनी लिहिलेल्या पत्रात परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर नियुक्तीसाठी पैसे मागितल्याचा आरोप केला होता. त्यावरुनच नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत आज (16 एप्रिल) अनिल परब आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं. यानंतर राऊत यांनी राणेंवर हल्लाबोल केलाय (MP Vinayak Raut criticize Narayan Rane after allegations on Anil Parab and Uddhav Thackeray).
विनायक राऊत म्हणाले, “ज्याचं राजकीय आयुष्यचं मेवा लूबाडण्यात गेलं त्या नारायण राणेंनी अनिल परब किंवा महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्याचं धारीष्ठ करू नये. नारायण राणेंच्या विरूद्ध आमच्याकडे अनेक पुरावे आहेत. उद्योगमंत्री असताना नारायण राणेंनी अनेक जमिनी हडप केल्या. या जमिनी वन खात्याच्या किंवा एमआयडीसीच्या असतील. त्यांची अनेक प्रकरणं आज सुद्धा बाहेर येत आहेत. त्यामुळे ज्याचं आयुष्यचं लुबाडणूकीत गेलं त्यांनी अनिल परबना शहाणपणा शिकवण्याची गरज नाही.”
“नारायण राणे हे सत्तेच्या खुर्चीसाठी झपाटलेले गृहस्थ”
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अत्यंत संयमाने आणि तेवढ्याचं निर्धाराने महाराष्ट्रात कोरोना नियंत्रणात ठेवण्याचं काम करत आहेत. हे महत्त्वाचं आहे. महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे जिथे शिस्तीचं आणि कोरोना नियंत्रित ठेवण्याचं पूर्णपणे पालन केलं जातंय. मात्र, ज्यांना काविळ झालेली त्यांना सगळचं पिवळं दिसतं. नारायण राणे हे सत्तेच्या खुर्चीसाठी झपाटलेले गृहस्थ आहेत. त्यांना खुर्ची मिळत नाही म्हणून वेडापीसा झालेला हा माणूस आहे. त्यामुळेच ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अशा पद्धतीने बरळत आहेत. त्यांना जे बरळायचं असेल, ते बरळू दे, मात्र शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संयमाने आणि निर्धाराने कोरोना नियंत्रणात ठेवण्याचं काम करत आहेत.
नारायण राणे काय म्हणाले होते?
अनिल परब हे सेवाभावी मंत्री आहेत. जमा करण्याचं आणि आणून द्यायचं काहीही कमिशन न घेता. म्हणून त्यांची चौकशी करावी. सेवा आणि मेवा कसा जमा केला, कुठून नेऊन पोहोचवला याची चौकशी झाली पाहिजे, असं ते म्हणाले. दीड हजार घ्या, पाचशे घ्या. शंभर घेऊन जा. हे काय आहे. चेष्टा आहे लोकांची. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असा असू शकतो, रडत लक्ष्मी अशी टीकाही त्यांनी केली.
मातोश्रीच्या पिंजऱ्यात बसून काय करता?
राज्य आहे, राज्याला स्वत:साठी लागणारा पैसा निर्माण करण्याचा अधिकार घटनेने दिलाय. त्यामुळे जरा संविधान वाचा. मातोश्रीच्या पिंजऱ्यात बसून काय राहता?, असा सवाल करतानाच माणसं मरत आहेत. 60 हजार लोकं मेलं आहेत. राज्य दिवाळखोरीकडे जात आहे. दीड हजार रुपये जाहीर करण्याचं काम क्लार्कचं आहे. मुख्यमंत्री म्हणून तुम्ही काय देता? असा सवालही त्यांनी दिला.
हेही वाचा :
नारायण राणेंच्या ‘त्या’ पत्राला शहांकडून केराची टोपली; विनायक राऊतांची टीका
खासदार मोहन डेलकर आत्महत्येचा तपास CBI कडे द्या, शिवसेना खासदाराची मागणी
व्हिडीओ पाहा :
MP Vinayak Raut criticize Narayan Rane after allegations on Anil Parab and Uddhav Thackeray