नवी दिल्ली : मुख्तार अब्बास नक्वी (Mukhtar Abbas Naqvi) यांनी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी आजच कॅबिनेट बैठकीत मुख्तार अब्बास नक्वी यांचे कौतुक केले होते. देशाच्या विकासात तुमचे योगदान असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले होते. मात्र अचानक आलेल्या या राजीनाम्याचं कारण काय? असा सावल आता विचारण्यात येत आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर लगेचच नक्वी यांनी दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात भाजप अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांची भेट घेतली.अलीकडेच उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजस्थानमधून भाजपचे अनेक नेते राज्यसभेवर निवडून आले. मात्र पक्षाने नक्वी यांना राज्यसभेचे तिकीट दिले नाही. त्यांचा राज्यसभा खासदार म्हणून कार्यकाळ गुरुवारी संपणार आहे.
एएनआय वृत्तसंस्थेचं ट्विट
Mukhtar Abbas Naqvi resigns as Union Minister of Minority Affairs pic.twitter.com/QNdbqHtvpw
— ANI (@ANI) July 6, 2022
नक्वी हे 2010 ते 2016 पर्यंत यूपीचे राज्यसभा सदस्य होते. 2016 मध्ये त्यांना झारखंडमधून राज्यसभेवर पाठवण्यात आले होते. नक्वी यांनी 1998 मध्ये पहिल्यांदा लोकसभा निवडणूक जिंकली आणि अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये त्यांना माहिती आणि प्रसारण मंत्रालयात राज्यमंत्री बनवण्यात आले. त्यानंतर 26 मे 2014 रोजी ते मोदी सरकारमध्ये अल्पसंख्याक आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री बनले. 12 जुलै 2016 रोजी नजमा हेपतुल्ला यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांना अल्पसंख्याक मंत्रालयाचा स्वतंत्र प्रभार मिळाला.
जेव्हा भाजपने मुख्तार यांना राज्यसभेसाठी संधी दिली नाही तेव्हा सर्व प्रकारच्या राजकीय चर्चांणा सुरुवात झाली. यावेळी भाजप मुस्लिम समाजातील राष्ट्रपतीपदाचा उमेदवार निवडू शकते अशी चर्चा सोशल मीडियावर होती. मात्र पक्षाने दौपदरी मुरम यांना उमेदवारी दिली आहे. अशा स्थितीत भाजप मुख्तार अब्बास नक्वी यांना उपराष्ट्रपती बनवू शकते असेही आता बोलले जात आहे. मात्र केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांचेही नाव चर्चेत आहे.
अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी आणि मंत्री आरसीपी सिंह यांचा राज्यसभेचा कार्यकाळ गुरुवारी संपणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यमान मंत्री संसदेच्या दोन्ही सभागृहातून बाहेर पडण्याची ही पहिलीच वेळ आहे. बिहारमधील मित्र पक्ष JDU मधून आलेल्या RCP सिंह यांनी एक वर्षापूर्वी 7 जुलै 2021 रोजी मोदी सरकारमध्ये मंत्री म्हणून शपथ घेतली होती. मात्र नुकत्याच झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकांमध्ये नितीश कुमार यांनी आरसीपी सिंग यांनाही पुन्हा संधी दिली नाही.