मुंबई, 22 जुलै 2023 : राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज वाढदिवस आहे. अजित पवार आतापर्यंत सातवेळा आमदार राहिलेत. तर आतापर्यंत पाचवेळा राज्याचं उपमुख्यमंत्रिपद त्यांनी भुषवलं आहे. अजित पवार यांची राजकीय कारकीर्द कशी आहे? त्यांनी लढलेली पहिली लोकसभेची निवडणूक ते आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात घेतलेली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ या त्यांच्या राजकीय कारकीर्दीचा आढावा घेऊयात…
1991 साली अजित पवार बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले. पण पुढे तीन- चार महिन्यातच त्यांना खासदारकी सोडावी लागली.
राजीव गांधी यांची हत्या झाली. त्या काळात शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री होते. पण त्यावेळी त्यांना केंद्रात बोलावण्यात आलं. तेव्हा शरद पवार यांच्यासाठी अजित पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघ सोडला. शरद पवार केंद्रात संरक्षणमंत्री झाले अन् अजित पवार बारामतीतून आमदार झाले. तेव्हापासून आतापर्यंत सातवेळा अजित पवार बारामती मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. तब्बल 32 वर्षांहून अधिककाळ बारामती मतदारसंघात त्यांचं वर्चस्व राहिलंय.
1993 ला झालेल्या मुंबई बॉम्बस्फोटावेळी शरद पवार राज्यात परतले. ते पुन्हा मुख्यमंत्री झाले अन् त्यांच्या मंत्रिमंडळात ऊर्जा खात्याच्या राज्यमंत्रिपदाचा पदभार अजित पवार यांच्याकडे देण्यात आला.
1999 साली जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली. तेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीचं सरकार सत्तेत आलं. तेव्हा अजित पवार पाटबंधारे आणि फलोत्पादन मंत्री झाले.
2004 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला 71 तर काँग्रेसला 69 जागांवर विजय मिळता आला. आघाडीतील नियमानुसार जास्त आमदार असल्याने राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री राज्यात होऊ शकला असता पण तसं घडलं नाही. शरद पवारांनी तडजोडी केल्या. त्यांनी उपमुख्यमंत्रिपद स्विकारलं. मात्र तेव्हा मुख्यमंत्रिपद हुकल्याची सल अजित पवार यांना कायम आहे. नुकतंच 5 जुलैला झालेल्या आमदारांच्या बैठकीत त्यांनी ती सल बोलून दाखवली.
2004 ते 2009 सालापर्यंत अजित पवार यांच्याकडे जलसंपदा खातं होतं. 2009 ते 2010 या काळात जलसंपदा आणि ऊर्जामंत्रिपद त्यांच्याकडे होतं. पुढे अजित पवार यांच्यासाठी नवी संधी आली ती उपमुख्यमंत्रिपदाची. 2010 ते 2012 या काळात ते उपमुख्यमंत्री राहिले. शिवाय वित्त नियोजन आणि ऊर्जा खातं त्यांच्याकडे होतं.
2012 ते 2014 या काळात वित्त, नियोजन आणि ऊर्जा या खात्यांसह उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी अजित पवारांकडे राहिली. 2019 ला एकीकडे महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत येण्याच्या हालचाली सुरू असताना अजित पवार देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत गेले. त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पण हे सरकार केवळ 80 तासच टिकलं.
2019 ते 2022 या काळात अजित पवार उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री राहिले. तर आता नुकतं अजित पवार यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जाणं पसंत केलंय. 2 जुलै 2023 ला अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आता ते शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत.