मुंबई : राज्यात नवी राजकीय समीकरणं पाहायला मिळत आहेत. अजित पवार शिवसेना-भाजप युतीमध्ये सामील झाले आहेत. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथही घेतली आहे. अजित पवार आणि त्यांच्या समर्थकांचं पहिल्या प्रतिक्रियेत स्वागत केलं असलं तरी आका शिंदेगट आणि भाजपमध्ये नाराजी असल्याची माहिती समोर आली आहे.
अजित पवार युतीत सहभागी झाल्याने त्याचा परिणाम सहाजिकच शिंदेगट आणि भाजपवर होणार आहे. मंत्रिमंडळ विस्तारात वर्णी लागण्याची चिन्हे असणाऱ्या नेत्यांवरही याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे शिंदेगट नाराज आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.
काहीही करा पण अजित पवार यांना अर्थ खातं देऊ नका. निधी मिळण्यास अडचणी निर्माण होतील, अशी शिंदेगटातील नेत्यांचं म्हणणं आहे.
शिवसेना शिंदेगटासोबतच भाजपमध्येही नाराजीचा सूर असल्याचं कळतं आहे. अजित पवार भाजपसोबत गेल्यामुळे भाजपमधील नेते देखील नाराज आहेत. माजी मंत्री, इंदापूरचे भाजप नेते हर्षवर्धन पाटील नाराज असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.
अजित पवार भाजपसोबत सत्तेत गेल्यामुळे हर्षवर्धन पाटलांची पंचाईत झाल्याचं बोललं जात आहे. हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार एकमेकांचे राजकीय विरोधक आहेत. जिल्हा बँक आणि जिल्ह्यातील सहकारात हे दोन्ही नेते कायमच एकमेकांच्या विरोधक राहिले आहेत. त्यामुळे आता अजित पवार भाजपसोबत आल्याने हर्षवर्धन पाटील नाराज आहेत, असं कळतं आहे.
शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला नव्हता. मंत्रिमंडळ विस्तार मागच्या वर्षभरापासून रखडला होता. मात्र नुकतंच अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झालाय खरा पण विस्तारात शिवसेना-भाजप नेत्यांना संधी मिळालेली नाहीये. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात संधीच्या प्रतिक्षेत असणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांमध्ये नाराजी आहे.
भाजपमधील दिग्गज नेत्यांना संधीची अपेक्षा होती. मात्र राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला सोबत घेतल्याने या नेत्यांची संधी हुकली. त्यामुळे भाजपमध्येदेखील नाराजीचा सूर आहे.