मुंबई : अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांनी भाजपसोबत जात शपथ घेतली. या सगळ्याचा महाविकास आघाडीवर परिणाम होईल, असं युतीचे नेते म्हणत आहेत. अशात शिवसेना ठाकरे गट एकला चलो रेची भूमिका घेणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. त्यावर ठाकरे गटाच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ठाकरे गटाचे नेते, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
आम्ही सध्या महाविकास आघाडीचा भाग आहोत. त्यामुळे शिवसेना ही एक महाविकास आघाडी म्हणूनच लढणार आहे. शिवसेनेची ताकद ही अन्य पक्षाला पण असली पाहिजे. त्यामुळे हा दौरा असणार आहे, असं अंबादास दानवे म्हणालेत.
ठाकरे गट एकला चलो रे च्या भूमिकेत आहे का? असा प्रश्न ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांना विचारण्यात आला. तेव्हा सध्या आम्ही महाविकास आघाडीत आहोत. अशा प्रकारचा कोणताही विचार कोणतीही चर्चा आमच्यात झालेली नाही. पुसटसा सुद्धा उल्लेख या ठिकाणी कुणी केलेला नाही. आम्ही सगळे सोबत आहोत, असं भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती व्हावी अशी अनेकांची इच्छा आहे. त्यावर अंबादास दानवे म्हणाले आहेत. हा निर्णय पक्षप्रमुखांचा आहे तो जो निर्णय घेतील त्याला आमचे समर्थन असणार आहे, असं अंबादास दानवे म्हणाले आहेत.
विधानसभा अध्यक्षपदाचा गैरवापर राहुल नार्वेकर यांनी केला नाही पाहिजे. निर्णय त्यांना घ्यायचाच आहे त्यांनी तो निर्णय लवकरात लवकर घ्यावा अशी शिवसेनेची भूमिका असणार आहे, असं म्हणत सोळा आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णयावर दानवेंनी भाष्य केलं आहे.
जिथे जिथे आपण कमी आहोत त्या जागा आपण भरल्या पाहिजेत. जास्तीत जास्त जनतेमध्ये जाऊन जनतेचे प्रश्न सोडवले पाहिजेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ती हे सरकार अपयशी ठरलेलं आहे. हे गद्दारांचं सरकार आहे. हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधातलं आहे. स्वतःची खळगी भरणारं हे सरकार आहे. त्यामुळे यांच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही दौरा करणार आहोत. या दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरे साहेब आदित्य ठाकरे आणि शिवसेनेचे सर्व नेते असणार आहेत, असं अंबादास दानवे म्हणालेत.