अर्थखातं एकनाथ शिंदे यांना द्या, पण अजितदादांना…; अंबादास दानवे यांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा

| Updated on: Jul 13, 2023 | 1:44 PM

Ambadas Danve on CM Eknath Shinde Ajit Pawar : ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांच्या 'त्या' एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण... विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा युती सरकारला खोचक टोला...

अर्थखातं एकनाथ शिंदे यांना द्या, पण अजितदादांना...; अंबादास दानवे यांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा
Follow us on

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार मागच्या वर्षभरापासून रखडला आहे. त्यात अजित पवार आणि शिंदेगटामध्ये काही खात्यांना घेऊन रस्सीखेच पाहायला मिळते आहे. अर्थखातं कुणाकडे असावं. यासंदर्भात युतीत दावे-प्रतिदावे केले जात आहेत. अर्थ खातं आपल्याकडे राहावं, यासाठी अजित पवार आग्रही आहेत. तर अजित पवार यांच्याकडे अर्थ खातं नको, अशी भूमिका शिंदेगटाची आहे. अशातच ठाकरे गटाचे नेते, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी खाते वाटपाच्या पेचावर भाष्य केलं आहे.

अर्थ खात्यावरून चाललेल्या गोंधळ पाहता अजित पवार यांना मुख्यमंत्री करा. एकनाथ शिंदे यांच्याकडे अर्थ खातं द्या आणि हा तिढा सोडवा, असं टोला अंबादास दानवे यांनी लगावला आहे.

भाजपने युती करण्यासाठी आधी शिवसेना आणि आता राष्ट्रवादी पक्षातून अनेक नाग गळ्यात अडकवले आहेत. ते त्यांना काम करून देणार आहेत का? असा सवाल अंबादास दानवे यांनी विचारला आहे.

मंत्रिपद गळ्यात पडेल, या आशेवर अनेकजण आहेत. त्यांनी शिवलेले कोट कपाटातच राहतील, असं चित्र सध्या दिसत आहे, असं दानवे म्हटलं आहे.

मंत्रिमंडळ विस्तार, खाते वाटप आणि अन्य बाबीवर चर्चा करण्यासाठी अजित पवार दिल्लीला गेले होते. तिथे त्यांनी अमित शाह यांची भेट घेतली. त्यावर अंबादास दानवे यांनी टीका केली आहे.

अजित पवार हे भाजपच्या दिल्लीवारीवर आधी टीका करत होते. आज शालीन नेतृत्व असलेल्या अजित पवार यांनाच दिल्लीच्या दरबारी मुजरे आणि हुजरेगिरी करावी लागतेय, यासारखं दुर्दैव काही नाही, असं दानवेंनी म्हटलं आहे.

आमदार बच्चू कडू यांनी पत्रकार परिषद घेत मंत्रिपदाबाबत भूमिका जाहीर केली. मंत्रिपदाचा त्याग करण्याची तयारी त्यांनी दाखवली. त्यावर बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस मंत्रिपद घ्या, म्हणून मागे लागलेत का? उलट सध्याचं चित्र पाहता ते बच्चू कडूंना मंत्रिपद देण्यास अनुकूल नाहीत, असंच दिसतंय. मग ते कसला त्याग करतायेत? या सर्व बनावट गोष्टी आहेत.

बच्चू कडू काय म्हणाले?

मी मंत्रिपदाचा दावा सोडण्याचा निर्णय घेणार होतो. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मी चर्चा करणार आहे. त्यानंतर मी माझा निर्णय घेणार आहे. मी 17 तारखेला मुख्यमंत्री यांना भेटून मग माझा निर्णय 18 तारखेला जाहीर करणार आहे. मुख्यमंत्र्यांनी फार विनंती केली. म्हणून मी सध्या निर्णय मागे घेत आहे, असं बच्चू कडू यांनी काही वेळा आधी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.