नवी मुंबई : मुंबई एपीएमसीच्या सभापतीपदी अशोक डक तर उपसभापतीपदी धनंजय वाडकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे होमपिच असलेली बारामती ही डक यांची सासरवाडी आहे. (Mumbai APMC Speaker Election Ashok Dak won)
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत मराठवाडा महसूल विभागाचे अशोक डक यांना सभापतीपद मिळाले. तर पुणे महसूल विभागातून महाविकास आघाडीचे उमेदवार धनंजय वाडकर यांना उपसभापतीपद बिनविरोधपणे देण्यात आले.
एपीएमसी सभापती निवडणूक महाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेची समजली जात होती. महाविकास आघाडीचे एकहाती वर्चस्व एपीएमसीवर प्रस्थापित झाले आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती (APMC) निवडणुकीत महाविकास आघाडीने दणदणीत विजय मिळवला होता, तर भाजपला खातंही उघडता आलेलं नव्हतं. सहा महसूल आणि चार व्यापारी मतदारसंघात भाजपला एकाही जागेवर विजय न मिळवता आल्याने महाविकास आघाडीने एपीएमसीवर निर्विवाद वर्चस्व ठेवलं होतं.
राज्यातला महाविकास आघाडीचा प्रयोग एपीएमसीमध्येही यशस्वी झाला आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी, काँग्रेस, शेकाप आणि शिवसेना यांनी आपले पॅनल बनवले होते.
बारामतीचे जावई अशोक डक
अशोक डक यांना शरद पवारांकडून एकनिष्ठेचे फळ मिळाले आहे. पवारांचे होमपिच असलेली बारामती ही डक यांची सासरवाडी असल्याने सासरवाडीकडून अधिक मासाचे ‘धोंडे’ गिफ्ट असल्याची प्रतिक्रिया माजलगावकरांमधून व्यक्त होत आहे. (Mumbai APMC Speaker Election Ashok Dak won)
40 वर्षापासून शरद पवार यांच्याशी जिल्ह्यातील ज्या काही एकनिष्ठ कुटुंबांची नावे समोर येतात, त्यात स्व. गोविंदराव डक यांचे अग्रगण्य नाव आहे. अशोक डक यांना मुंबईचे सभापतीपद मिळणार हे जाहीर होते. या वृत्तावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. अशोक डक यांचा सभापतीपदासाठी एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची निवड निश्चित झाली.
उपसभापतीपदी धनंजय वाडकर
उपसभापतीपदासाठी काँग्रेसकडून धनंजय वाडकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांचीही निवड उपसभापतीपदासाठी झाली असून दोघांच्या निवडीची केवळ औपचारिकता बाकी होती.
VIDEO : महाफास्ट न्यूज 100 pic.twitter.com/WmGa3cMcKB
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 31, 2020