मुंबईः माणसं फोडून मतं घेणं हीच भाजपची रणनीती राहिलेली आहे. मागील विधान परिषद निवडणुकांवेळी (MLC Election) ती जास्त स्पष्ट दिसून आली. आता नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीतही तेच दिसून आलं, त्यामुळे महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) म्हणून आम्हाला जास्तीत जास्त विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागणार आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी दिली. मुंबईत त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देताना भाजपवर हे आरोप केले.
नाशिक आणि नागपूर पदवीधर मतदार संघात महाविकास आघाडीचा पाठिंबा नेमका कुणाला असेल यावरून सध्या तरी गोंधळाची स्थिती पहायला मिळतेय. यावरून अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली.
ते म्हणाले, नाशिकच्या निवडणुकीत कुणाला पाठिंबा द्यायचा, यासाठी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा होणार आहे. शिवसेनेनी एका जागेची मागणी केली होती. त्यानुसार नाशिकच्या जागेवर त्यांनी क्लेम केला आहे. त्यामुळे अंतिम निर्णय घेताना त्यांनाही विश्वासात घेणार आहोत. महाविकास आघाडी म्हणूनच हा निर्णय जाहीर केला जाईल.
कुणाला पाठिंबा द्यायचा, यावरून काँग्रेसमध्येच वाद आहेत का, अशी चर्चा आहे. यावर अशोक चव्हाण म्हणाले, ‘ वादविवाद नसतो. पण अनेकजण इच्छुक असतात. त्यामुळे हे विषय सामंजस्याने चर्चा करून सोडवावे लागतात. जागा निवडून येणं हा एकच क्रायटेरिया आहे. त्यामुळे तिन्ही पक्षाचे एकत्र प्रयत्न झाले तर निवडून येणं सोपं जातं…
भाजपवर आरोप करताना अशोक चव्हाण म्हणाले, ‘ विधान परिषदेतही मतं फोडाफोडीचं काम भाजपनेच केलं आहे. माणसं फोडून मतं घ्यायचं हा प्रयोग मागच्या विधान परिषद निवडणूकीत स्पष्ट झाला. नाशिकमध्येही तोच प्रयोग केला गेला. त्यामुळे आता नाशिकचा निर्णय घेताना विचारपूर्वक घ्यावा, असाच प्रयत्न आहे.
नाशिक पदवीधर निवडणुकीत तांबे पिता पुत्रांनी काँग्रेसला धोका दिल्याचं चित्र आहे. यावरून अशोक चव्हाण यांनी चिंता व्यक्त केली. ते महणाले, ‘ काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनीही नाशिकमधील घटनेबाबत गांभीर्य व्यक्त केलं आहे. काही उमेदवारांनी आधीच इच्छा व्यक्त केली असती तर तिकिट देत असतानाच हा विषय टाळता आला असता.. परंतु त्यावेळेला ते घडलं नाही.
दावोस येथील परिषदेत महाराष्ट्रात कोट्यवधींच्या गुंतवणुकीचे एमओयू करण्यात आले. त्यावरून अशोक चव्हाण म्हणाले, ‘ महाराष्ट्रात गुंतवणूक वाढावी, महाराष्ट्रात सर्वात मोठा बेरोजगारीचा प्रश्न आहे. या विषयाला गांभीर्यानं घेतलेलं नाही. मुख्यमंत्र्यांनी ज्या कमिटमेंट घेतल्या आहेत, त्याचं प्रत्यक्ष गुंतवणूक होईल, जागा घेतली जाईल, तेव्हाच ही सकारात्मक बाब म्हणली जाईल.
काँग्रेसची अवस्था अत्यंत वाईट असून पक्षाकडे आता उमेदवारच नाहीत, अशी चर्चा सुरु असते. अशोक चव्हाण यांनी उत्तर दिलंय. ते म्हणाले, ‘ काँग्रेसकडे उमेदवारच नाही, असं वातावरण नाही. आमच्याकडे जास्त उमेदवार आहेत. त्यात महाविकास आघाडीचे घटकपक्ष आमच्यासोबत आहेत, त्यामुळे चर्चा करूनच हे निर्णय घ्यावे लागतात, असं स्पष्टीकरण अशोक चव्हाण यांनी दिलंय.