याकूब मेमनच्या कबरीचा फोटो वेगाने का शेअर केला जातोय? उद्धव सरकारवर भाजपचा गंभीर आरोप

| Updated on: Sep 08, 2022 | 11:14 AM

असंख्य मुंबईकरांचे प्राण घेणाऱ्या मुंबई स्फोटांचा दोषी याकूब मेमन. त्याच्या कबरीचा फोटो आज वेगाने व्हायरल होतोय. भाजप आणि शिवसेनेचे नेते परस्परांवर आरोप करत आहेत.

याकूब मेमनच्या कबरीचा फोटो वेगाने का शेअर केला जातोय? उद्धव सरकारवर भाजपचा गंभीर आरोप
याकूब मेमनच्या कबरीवरील सजावटीचा फोटो व्हायरल होतोय
Image Credit source: social media
Follow us on

मुंबईः मुंबई स्फोटांतला दोषी याकूब मेमनच्या (Yakub Menon) कबरीचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय. लोकांचं लक्ष वेधून घेतोय. त्याचं कारण म्हणजे याकूब मेमनची कबर (Tomb) फुलांनी सजवण्यात आली आहे. यामुळे आता नवा वाद उफाळून आलाय. भाजपने या प्रकरणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) निशाणा साधलाय. मुंबईच्या गुन्हेगाराची कबर अशी का सजवण्यात आली आहे? असा सवाल उपस्थित केलाय. भाजप नेते राम कदम (Ram Kadam) यांनी तर थेट आरोप केला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, तेव्हाच याकूब मेमनच्या कबरीचं मजारमध्ये रुपांतर करण्यात आलंय, असं ते म्हणालेत.

राम कदम म्हणाले…

भाजप नेते राम कदम यांनी ट्विट केलंय. ते म्हणाले, ”उद्धव ठाकरे, शरद पवार आणि राहुल गांधींनी मुंबईकरांची जाहीर माफी मागितली पाहिजे. ही कबर एखाद्या पीरबाबाची नव्हे तर 1993 मधील मुंबई स्फोटांतील दोषी याकूब मेमनची आहे. एका गुन्हेगाराच्या कबरीवर पांढरी मार्बल लावून तिला मजार बनवण्यात आलं.” 1993 च्या स्फोटांच्या गुन्हेगाराच्या कबरीला एवढी सजावट का? हा प्रश्न आता उफाळून आलाय. सोशल मीडियावर लोकही वेगाने व्यक्त होत आहेत.

राम कदमांचं ट्विट काय?

मुंबईला थांबवणारा तो स्फोट

12 मार्च 1993 रोजी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नेतृत्वात मुंबईत स्फोटांची मालिका घडवून आणली गेली. यात जवळपास 257 नागरिकांचा मृत्यू झाला होता. तर 700 जण जखमी झाले होते. या स्फोटांतील एक दोषी सिद्ध झाल्यानंतर  30 जुलै 2015 रोजी याकूब मेमनला फाशी देण्यात आली होती.

सजावटीचा फोटो जूना?

दरम्यान, सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा फोटो जुना असल्याचा दावा बडा कब्रस्तानचे अध्यक्ष शोएब खातिब यांनी केलाय. शब्बे बारातच्या रात्रीचा हा फोटो खोट्या बतम्या पसवण्यासाठी शेअर केला जातोय, असा आरोप त्यांनी केलाय. सध्या कबरीवर कोणतीही लायटिंग नाहीये. कुणाला खात्री करून घ्यायची असेल तर त्यांनी करावी, असं वक्तव्य त्यांनी केलंय.

अंबादास दानवे काय म्हणाले?

तर शिवसेना नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही या वर ट्विट केलंय. मुंबई आणि मुंबईकरांना धुळीस मिळवण्याचे मनसुबे रचणाऱ्या याकूब मेमनच्या कबरीचे उदात्तीकरण करण्याचे काम सुरु असल्याचे दिसतेय. हे काम त्वरित थांबवून या कामाची चौकशी सरकारने करावी, हे धाडस कुणाकडून झाले आहे, हेपण समोर यायला हवे, अशी मागणी त्यांनी केली आहे.