महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी, प्रखर हिंदुत्वाच्या रक्षणासाठी, सज्ज पुन्हा शिवसेना!; शिंदे सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त शिवसेनेकडून खास व्हीडिओ शेअर

| Updated on: Jun 30, 2023 | 3:59 PM

CM Ekanath Shinde Government completed one year : शिंदे-फडणवीस सरकारची वर्षपूर्ती; शिवसेनेकडून खास व्हीडिओ शेअर; देव, देश अन् धर्मासाठी फडकला भगवा वादळातही....

महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी, प्रखर हिंदुत्वाच्या रक्षणासाठी, सज्ज पुन्हा शिवसेना!; शिंदे सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त शिवसेनेकडून खास व्हीडिओ शेअर
Follow us on

मुंबई : आजचा हाच तो दिवस जेव्हा एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची तर देवेंद्र फणडवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी घटना याच दिवशी म्हणजे 30 जून 2022  रोजी घडली.  शिंदे सरकार सत्तेत येऊन आज एक वर्षपूर्ण झालं आहे. त्यानिमित्त शिवसेनेकडून एक व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हीडिओमध्ये विविध बाबींवर भाष्य करण्यात आलं आहे.

महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी, प्रखर हिंदुत्वाच्या रक्षणासाठी. सज्ज पुन्हा शिवसेना, सज्ज पुन्हा शिवसेना… आशीर्वाद शिवछत्रपतींचे, एक वर्ष सुराज्याचे…, असं म्हणत शिवसेनेकडून हा व्हीडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे.

संघर्ष होता प्रत्येक वाटेवर आणि प्रत्येक वाट होती रोखलेली, वार होते कडवट… जिव्हारी आणि तेवढेच विखारी पण एकाकी लढाई होती, देव देश अन् धर्मासाठी… म्हणून फडकला भगवा वादळातही, असं म्हणत या व्हीडिओची सुरूवात करण्यात आली आहे.

शिवसेनेनं शेअर केलेल्या या व्हीडिओमध्ये एकनाथ शिंदे यांनी बंड केलं तेव्हाचे क्षण दाखवण्यात आले आहेत. तसंच शिंदे यांनी शपथ घेतली तो क्षण दखवण्यात आला आहे.

नेतृत्वाने कवेत घेतला अवघा आसमंत, संपवले दरबारी राजकारण आणि गहिवरून गेले जनमन, असं म्हणत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका तर एकनाथ शिंदे यांचं कौतुक करण्यात आलं आहे.

सुरू झाला प्रत्यक्ष गतिमान कारभार, विकासाची दिसली दिशा, महाराष्ट्राच्या समृद्धीची उजळली भाग्यरेषा, असं म्हणत समृद्धी महामार्गावरही भाष्य करण्यात आलं आहे.

सुराज्याच्या उदयाने आली वेगवान कारभाराची प्रचिती, जनतेच्या सरकारची झाली वर्षपूर्ती… शिवछत्रपतींचा हाच विचार, हिंदूहृदयसम्राट हाच आदर्श, धर्मवीरांची हीच शिकवण!, असं म्हणत शिंदे गटाने आपली विचारधारा पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे.

या महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी, प्रखर हिंदुत्वाच्या रक्षणासाठी. सज्ज पुन्हा शिवसेना, सज्ज पुन्हा शिवसेना… असं म्हणत हा शिवसेनेकडून व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे.

शिवसेनेनं शेअर केलेल्या या व्हीडिओवर विविध कमेंट पाहायला मिळत आहेत. अनेकांनी सरकारच्या वर्षपूर्ती निमित्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या आहेत.