मुंबई | 03 ऑगस्ट 2023 : काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. विधिमंडळात आज त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यानंतर वडेट्टीवार यांचं अभिनंदन करण्यात आलं. वडेट्टीवार यांच्यासाठी अभिनंदन प्रस्ताव मांडण्यात आला. तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विजय वडेट्टीवार यांचं अभिनंदन केलं. पण हे अभिनंदन करताना चिमटेही त्यांनी काढले.
विजय वडेट्टीवार यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली आहे. त्यांचं मी अभिनंदन करतो. तुम्ही वर्क फ्रॉम होम करणारे नेते नाहीत. त्यामुळे मला आशा आहे की, तुम्ही वर्क फ्रॉम होम करणार नाहीत. विजय वडेट्टीवार हे माजी शिवसैनिक आहेत. बाळासाहेबांच्या विचारांनुसार त्यांचं काम आजही सुरु आहे, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
काही लोकांना बाळासाहेब ठाकरे यांचा सहवास लाभला. पण त्यांचे संस्कार लाभले नाहीत. वर्ष झालं तरी काहींना खुर्ची गेल्याचं दु:ख अजूनही आहे, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
निवडणुकांत्या आधी वडेट्टीवार विरोधी पक्षनेते झाले आहेत. मात्र लक्षात ठेवा सरकार आमचंच येणार आहे, असंही त्यांनी म्हटलं.
कालचे विरोधी पक्षनेते आज आमच्यासोबत आहेत, असं म्हणत राधा कृष्ण विखे पाटील, अजित पवार यांचं नाव घेत एकनाथ शिंदे यांनी जोरदार बॅटिंग केली आहे.
विजय वडेट्टीवार यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली. त्याबद्दल मी विजू भाऊंचं अभिनंदन करतो. यापदाचा मान-सन्मान वाढवण्या करिता ते चांगलं कार्य करतील, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
महाराष्ट्राला सक्षम विरोधी पक्षनेत्यांची परंपरा आहे. तुम्हीही या सक्षम विरोधी पक्षनेत्यांच्या यादीत जाऊन बसाल, अशी आशा व्यक्त करतो, असंही ते म्हणाले.
वडेट्टीवार म्हणजे विदर्भाचा बुलंद आवाज, त्यांनी दोनवेळा विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली. त्यांचं अभिनंदन. त्यांचा आवाज माईकपेक्षाही मोठा आहे. त्यामुळे त्यांना माईकची गरज नाही, अशी मिश्किल टिपण्णीही फडणवीसांनी केली.
अजित पवार यांनी याआधीच्या विरोधी पक्षनेत्यांच्या नावांची यादी वाचून दाखवली. तसंच विजय वडेट्टीवार यांचं अभिनंदन केलं. विरोधी पक्षनेतेपद मिळणं एक संधी आहे. वडेट्ट्वारी चांगलं काम करतील, असंही अजित पवार म्हणाले.