Devendra Fadnavis Birthday : सर्वात तरूण महापौर ते दोन वेळा राज्याचं मुख्यमंत्रिपद; जाणून घ्या देवेंद्र फडणवीस यांची कारकीर्द…

| Updated on: Jul 22, 2024 | 11:01 AM

Devendra Fadnavis Birthday : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस आहे. भाजप युवा मोर्चाचे वॉर्ड अध्यक्ष ते राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलंय. त्यांच्या राजकीय कारकीर्दीवर एक नजर टाकूयात...

Devendra Fadnavis Birthday : सर्वात तरूण महापौर ते दोन वेळा राज्याचं मुख्यमंत्रिपद; जाणून घ्या देवेंद्र फडणवीस यांची कारकीर्द...
Follow us on

भाजपचे वरिष्ठ नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या आतापर्यंतच्या राजकीय कार्यकाळात बरेच चढउतार आले. भाजप युवा मोर्चाचे वॉर्ड अध्यक्ष ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असा त्यांच्या राजकीय प्रवास आहे. सध्या ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांच्या या राजकीय कारकीर्दीचा आढावा घेऊयात…

साल होतं 1989… देवेंद्र फडणवीस भाजपमध्ये सक्रीय झाले होते. त्यांच्यावर भाजप युवा मोर्चाच्या वॉर्ड अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. पुढे 1990 साली ते नागपूर शहराच्या पश्चिम विभागाची जबाबदारी देण्यात आली. 1992 ला देवेंद्र फडणवीस हे भाजप युवा मोर्चाचे नागपूर शहर अध्यक्ष झाले. 1992 ते 2001 या काळात ते नागपूरचे महापौर झाले. सलग दोन वेळा नागपूर महापालिकेचे सदस्य म्हणून निवडून आले. तसंच सर्वात तरूण महापौर होण्याचा बहुमानही फडणवीस यांच्याच नावावर आहे.

पहिल्यांदा आमदार

पुढे दोन वर्षात 1994 ला फडणवीस भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष झाले. 1999 साली ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. 2001 साली देवेंद्र फडणवीस यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली. 2010 ला भाजपच्या प्रदेश सरचिटणीसपदाचीही जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली.

पहिल्यांदा मुख्यमंत्री

2013 हे साल देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी अत्यंत महत्वाचं ठरलं. कारण याच काळात त्यांच्याकडे भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. तेव्हा त्यांच्या डोळ्यापुढे 2014 च्या निवडणुका होत्या. तेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वगुणांचा विस्तार झाला. तेच भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या लक्षात आलं. त्यामुळे महाराष्ट्रातील दिग्गज मंडळींना मागे सारत देवेंद्र फडणवीस हे पहिल्यांदा राज्याचे मुख्यमंत्री झाले. यावेळी ते 44 वर्षांचे होते.

80 तासात सरकार पडलं

2019 ला शिवसेनेसोबतची युती तुटल्यानंतर त्यांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्यण घेतला. पुढे हे सरकार केवळ औट घटकेचं ठरलं. 80 तासात हे सरकार पडलं. विशेष योगायोग म्हणजे अजित पवार यांचाही आज वाढदिवस आहे. 2014 आणि 2019 या दोन वेळा देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाले. सध्या शिंदे सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्री आहेत.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, नगरविकास, गृहनिर्माण स्थायी समिती, अंदाज समिती, नियम समिती, सार्वजनिक उपक्रम समिती या समितींवरही देवेंद्र फडणवीस यांनी काम केलं आहे.