मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार गटातील मंत्र्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली आहे. त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मला याची काही कल्पना नाहीये. पण जर त्यांनी पवारसाहेबांची भेट घेतली असेल. त्यात वेगळं काही नाही. कारण वर्षानुवर्षे शरद पवार हे त्यांचे नेते राहिले आहेत. त्यामुळे जर ही भेट झाली असेल तर त्यात काही वावगं आहे, असं मला वाटत नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत.
या मंत्र्यांनी शरद पवार यांची भेट घेण्यामागे काही राजकीय समीकरणं आहेत, असं वाटतं का? असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा मला त्याची काही कल्पना नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे, राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे, धनंजय मुंडे, अनिल पाटील धर्मराव बाबा पाटील, संजय बनसोडे, नरहरी झिरवळ यांच्यासह राष्ट्रवादीचे सर्व मंत्री काही वेळाआधी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये गेले होते. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यशवंतराव चव्हाण सेंटरमध्येच असल्याने त्यांची भेट घेण्यासाठी हे नेते पोहोचले होते.
अजित पवार यांनी भाजपसोबत जात सत्तेत सामील होण्याचा निर्णय घेतला. तेव्हा राष्ट्रवादीत उभी फूट पडली. या फुटीनंतर झालेल्या आमदारांच्या बैठकीत अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर आरोप केले. अजित पवार यांच्या आरोपांना शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनीही उत्तर दिलं. त्यानंतर राष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये दरी निर्माण झाली असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं गेलं. मात्र आज अजित पवार गटातील नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
आमचे सर्वांचे दैवत, आमचे नेते, आदरणीय शरद पवार यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही आलो आहोत. त्यांची वेळ न मागता आम्ही आलो. त्यांना भेटलो. पवार साहेबांच्या पाया पडून आशीर्वाद मागितले, असं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं आहे.
आमच्या मनात पवार साहेबांबद्दल आदर आहे. राष्ट्रवादी पक्ष एकसंघ राहावा यासाठी त्यांनी योग्य विचार करावा. आम्हाला मार्गदर्शन करावं, अशी विनंती त्यांना केली, असं प्रफुल्ल पटेल सांगितलं आहे.