मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. सुप्रीम कोर्टातील (Supreme Court) राज्याच्या सत्तासंघर्षाचा निकाल कधीही जाहीर होऊ शकतो. खरंतर संपूर्ण महाराष्ट्र या निकालाची वाट पाहत आहे. या निकालानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक घडोमोडी घडण्याची शक्यता आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिलासा दिलाय. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना पक्ष बहाल केलाय. पण या सगळ्या घडामोडींनंतर आता एकनाथ शिंदे यांना धक्का देणारी बातमी समोर आली आहे. मुंबई हायकोर्टाने शिंदे सरकारला मोठा झटका दिला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिंदे शिवसेनेची राज्यात चांगली वाटचाल होताना दिसत आहे. ठाकरे गटाचे अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करताना दिसत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात अनेक विकासकामांना गती दिली जात असल्याचा दावा सरकारकडून केला जातोय. पण दुसरीकडे विरोधकांकडून एकनाथ शिंदे यांच्या सरकारकडून निधी वाटपात दुजाभाव केला जात असल्याचा आरोप केला जातोय. याच विषयी मुंबई हायकोर्टात शिंदे सरकार विरोधात याचिका दाखल करण्यात आलीय.
एकनाथ शिंदे सरकार आमदार निधी वाटपात दुजाभाव करत असल्याचा आरोप करत ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केलीय. या याचिकेवर मुंबई हायकोर्टात आज सुनावणी झाली. पण ही सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे. तसेच कोर्टाने निधी वाटपावरील स्थगिती कायम ठेवली आहे. त्यामुळे हा शिंदे सरकारसाठी पुन्हा मोठा झटका मानला जातोय.
विशेष म्हणजे मुंबई हायकोर्टात झालेल्या सुनावणीत राज्य सरकारने आज नव्याने आपले 2 प्रतिज्ञापत्रे सादर केली. मात्र पुढील सुनावणी 13 जून रोजी ठेवण्यात आली आहे. गेल्यावेळी याचिकाकर्त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर राज्य सरकारने सादर केलेले प्रतिज्ञापत्र हायकोर्टाने नाकारलं होतं. तसेच विकास निधी वाटप प्रकरणात स्थगिती ठेवली होती. ती स्थगिती हायकोर्टाने कायम ठेवली आहे.
एकीकडे मुंबई हायकोर्टाने निधी वाटपावरील स्थगिती कायम ठेवली आहे, तर दुसरीकडे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार राष्ट्रवादीच्या 40 आमदारांसोबत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. या चर्चांवर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिलीय. आपण कुणासोबतही जाणार नसून चुकीच्या बातम्या पेरल्या जात असल्याची त्यांनी भूमिका मांडली आहे. तर दुसरीकडे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे जपानचा दौरा अर्धवट सोडून मुंबईला परतत असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल समोर येण्याआधी या घडामोडींना जास्त महत्त्व प्राप्त झालं आहे.