मुंबई | 01 ऑगस्ट 2023 : देशातील प्रमुख विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची मुंबईत बैठक होत आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे, लालू प्रसाद यादव यांच्यासह देशभरातील महत्वाचे नेते हॉटेल ग्रँड हयातमध्ये पोहोचले आहे. या बैठकीवेळी अचानकपणे एका बड्या नेत्याची एन्ट्री झाली. या नेत्याच्या येण्याने या बैठकीतील नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरली. देशाच्या राजकारणाची जाण असलेले वरिष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी या बैठकीत हजेरी लावली. काही दिवसांआधी कपिल सिब्बल हे काँग्रसमधून बाहेर पडले आहेत. आता त्यांनी अशी अचानकपणे लावलेली हजेरी चर्चेत आली आहे.
काँग्रेसमधून बाहेर जाताना कपिल सिब्बल यांनी राहुल गांधींवरही टीका केली होती. अशात आता इंडियाच्या बैठकीत ते अचानकपणे आल्याने उपस्थितांमध्ये अस्वस्थता पाहायला मिळाली. इंडिया आघाडीची दोन दिवस बैठक होतेय. काल आणि आज ही बैठक आयोजित आहे. अशात देशातील महत्वाचे नेते मुंबईत दाखल झाले आहेत. या नेत्यांनी काहीवेळा आधी एकत्रित फोटो सेशन केलं. या फोटो सेशनवेळी कपिल सिब्बल आल्याने एकच सुरु चर्चा झाली. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याशी बोलत कपिल सिब्बल यांनी या बैठकीत एन्ट्री केली. फारूख अब्दुल्ला यांनी कपिल सिब्बल यांना या बैठकीत बोलावल्याची माहिती आहे.
इंडिया आघाडीच्या संयोजकपदी कोण असेल? अशी चर्चा मागच्या काही दिवसांपासून होतेय. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचं नाव चर्चेत आहे. पण इंडियाच्या या बैठकीतील आसन व्यवस्थेमुळे शरद पवार यांचं नाव निश्चित झालं आहे का? असा सवाल उपस्थित होतोय. कारण शरद पवारांना बैठकीच्या मध्यभागील खुर्चीवर स्थान देण्यात आलंय. सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरेंना पवारांच्या बाजूची खुर्ची देण्यात आली आहे. त्यामुळे शरद पवार इंडिया आघाडीचे संयोजक होणार का?, अशी चर्चा सुरु झाली आहे.