आमचा सरकारला पाठिंबा नाही, विधानसभेत विरोधात बसण्यासाठी जागा उपलब्ध करून द्या; जयंत पाटील यांची मागणी

| Updated on: Jul 17, 2023 | 11:18 AM

Maharashtra Legislature Monsoon Session 2023 : पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांकडे मागणी म्हणाले, आसनव्यवस्था उपलब्ध करून द्या...

आमचा सरकारला पाठिंबा नाही, विधानसभेत विरोधात बसण्यासाठी जागा उपलब्ध करून द्या; जयंत पाटील यांची मागणी
Follow us on

मुंबई | 17 जुलै 2023 : आजपासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या वतीने विधानसभा अध्यक्षांकडे विधानसभेतील आसनव्यवस्थेबाबत विनंती करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचा एक गट हा भाजपसोबत जात सत्तेत सहभागी झाल्याने राष्ट्रवादीतील शरद पवार गट या अधिनेशना दरम्यान नेमका कुठे बसणार, ते सत्तेत बसणार की महाविकास आघाडीतील इतर मित्र पक्षांसोबत विरोधात बसणार, हा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. त्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली आहे.

विधिमंडळाचं अधिवेशन सुरु होत आहे. अशात तुम्ही कुठे बसणार? सत्तेत की विरोधात? असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीची भूमिका मांडली. आम्ही सरकारला पाठिंबा दिलेला नाही. त्यामुळे विरोधीपक्षात बसण्यासाठी जागा विधानसभा अध्यक्षांनी उपलब्ध करून द्यावी, अशी आमची अपेक्षा आहे, असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील म्हटलं आहे.

अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडली आहे. अशात अधिवेशन काळात राष्ट्रवादीची भूमिका काय? त्यांची आसनव्यवस्था कशी असेल, असे प्रश्न चर्चेत असतानाच जयंत पाटील यांनी विरोधी पक्षांच्याबरोबरच आपल्याला बसण्याची व्यवस्था करून देण्याची विनंती केली आहे.

कार्यालयात बदल नाही

विधिमंडळातील राष्ट्रवादीच्या कार्यलयात बदल झालेला नाही. अजित पवार गट आणि शरद पवार गटाला एकच कार्यालय आहे. या कार्यालयात शरद पवार यांचा फोटो आहे. तर दारावर अनिल पाटील प्रतोद असं लिहिण्यात आलं आहे.

आम्ही विधीमंडळातील राष्ट्रवादीच्या कार्यालयात येण्यासाठी कोणालाही मज्जाव करणार नाही. लवकरच सर्व आमदार आमच्यासोबत पाहिला मिळतील, अशी माहिती मंत्री अनिल पाटील यांनी टिवी 9 मराठीला दिली आहे.

आजपासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु झालं आहे. अजित पवार हे भाजपसोबत जात सत्तेत सहभागी झाले आहेत. त्यानंतर होणारं हे पहिलं अधिवेशन आहे. त्यामुळे या अधिनेशनाकडे सगळ्यांचं लक्ष आहे.

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतमालाला मिळणारा हमीभाव, महिला सुरक्षेचा प्रश्न यावरून विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे.