मुंबईः शिंदे-भाजप (Shinde BJP) सरकार विरोधात महाविकास आघाडीने आज महामोर्चाचं (Mahamorcha) आयोजन केलं आहे. राज्यभरातून लाखो कार्यकर्ते आज मुंबईत दाखल होत आहेत. मुंबईतील क्रूडास कंपनी ते टाइव्ह ऑफ इंडियाच्या इमारतीपर्यंत हा मोर्चा निघणार आहे. या मोर्चात महापुरुषांचे पुतळेदेखील असतील. चित्ररथाच्या माध्यमातून महापुरुषांच्या योगदानाचे महत्त्व समजवून सांगण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीतर्फे करण्यात येणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य पुतळे या रॅलीत सहभागी करून घेतले जात आहेत.
जे जे फ्लाय ओव्हरवरून महापुरुषांचे पुतळे असलेल्या गाड्या जातील. भाजप किंवा शिंदे सरकारच्या ज्या ज्या नेत्यांनी या महापुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्य केली आहेत, त्याचा निषेध या चित्ररथाच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
महापुरुषांचा अपमान आम्ही सहन करू शकणार नाहीत, असा संदेश महाविकास आघाडी देणार आहे. महामोर्चाला सुरुवात होईल, त्यावेळी या पुतळ्यांवर वाहण्यासाठी फुलांच्या पाकळ्या देखील ठेवण्यात आल्या आहेत.
मुंबईत महाविकास आघाडीच्या मोर्चामुळे राजकारण तापलं असतानाच भाजपतर्फेदेखील मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. हिंदू देवी देवता तसेच महापुरुषांचा अवमान करणाऱ्या वक्तव्यांविरोधात हे आंदोलन आहे. शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याचा निषेध भाजपातर्फे करण्यात येतोय.