विनायक डावरूंग, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, मुंबई | 27 नोव्हेंबर 2023 : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीला आता वेग आला आहे. विधानसभा अध्यक्षांसमोर सध्या सुनावणी होत आहे. मात्र शिनसेनेच्या दोन आमदारांची अपात्रता प्रकरणातून सुटका होण्याची शक्यता आहे. विधानपरिषदेतील शिवसेनेच्या आमदार डॉ. मनिषा कायंदे आणि विप्लव बजोरिया यांची या दोन नेत्यांना अपात्रता प्रकरणाचा धोका कमी आहे. पुढच्या काही महिन्यात घडणाऱ्या घडामोडींमुळे या आमदारांचा अपात्रतेच्या धोक्यापासून बचाव होऊ शकतो. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह या आमदारांना दिलासा मिळू शकतो.
एकीकडे शिवसेनेच्या आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. अशात विधानपरिषदेतील दोन शिवसेना आमदारांची अपात्रतेचा धोक्यातून सुटकेची शक्यता आहे. आमदार मनिषा कायंदे आणि विप्लव बजोरिया यांच्या विधानपरिषद आमदारकीचा कार्यकाळ पुढील काही महिन्यात संपणार आहे. त्यामुळे आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल कधी लागणार हे अदियाप निश्चित नाही. अपात्रता प्रकरणातील याचिकांवरील सुनावणीबाबत अनिश्चितता आहे. त्यामुळे त्यांची या अपात्रतेच्या धोक्यापासून सुटका होण्याची चिन्हे आहेत.
काही दिवसांआधी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार डॉ. मनिषा कायंदे आणि विप्लव बजोरिया यांनी शिंदे गटात प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांची साथ सोडत या नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. यामुळे उद्धव ठाकरे गटाने त्यांच्याविरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली आहे.
विधानपरिषद सभापतीपद सध्या रिक्त आहे. डॉ. नीलम गोऱ्हे या स्वत: आपल्याविरोधातील याचिकेवर निर्णय देवू शकत नसल्याने. त्यावर सुनावणी सध्यातरी होणार नाही. तर नीलम गोऱ्हे आणि कायंदे, बजोरिया या दोन आमदारांविरूद्धही एकत्रित याचिका दाखल करण्यात आली आहे. ठाकरे गटाला तिघांविरोधातील याचिकेवर सुनावणी हवी आहे. पण सध्या ती प्रलंबित ठेवण्यात आली आहे. विधानपरिषदेतील शिवसेना आमदार अपात्रता याचिकांवरील सुनावणीबाबत अनिश्चिता आहे. तसंच नवीन सभापतींची निवड झाल्यावरच ती होण्याची चिन्हे आहेत.