मुंबई : मुंबईच्या महापौरपदावर विराजमान झाल्यानंतर किशोरी पेडणेकर यांनी महापौर दालनातील प्रवेशमार्गच (Kishori Pednekar changes entrance) बदलला. त्यामुळे पेडणेकरांनी वास्तूशास्त्रावरील अंधविश्वासातून हे ‘बदलाबदल’ केली का, अशी चर्चा महापालिकेत दबक्या आवाजात सुरु आहे.
महापौर दालनाच्या नूतनीकरणानंतर आजवर पहिल्या प्रवेशद्वाराचाच वापर केला जायचा. परंतु आता हे प्रवेशद्वार बंद करुन त्याऐवजी शेजारचे प्रवेशद्वार खुले करण्यात आले आहे. त्यामुळे अवघ्या दहा ते पंधरा दिवसांमध्ये महापौरांनी दालनाचा प्रवेशमार्ग बदलत आसन व्यवस्थाही बदल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
नव्या महापौरांना कोणत्या ग्रहाचा दोष आहे का किंवा कुठल्या ग्रहांची वक्रदृष्टी टाळण्यासाठी वास्तू रचना बदलली जात आहे का, अशी कुजबूज महापालिका मुख्यालयात ऐकायला मिळत आहे. 22 नोव्हेंबरला किशोरी पेडणेकर यांची महापौरपदी बिनविरोध निवड झाली. त्यानंतर पेडणेकर यांनी मागील पंधरा दिवसांपासून बैठकांचा धडाका लावला आहे.
पदभार स्वीकारल्यानंतर महापौर किशोरी पेडणेकर यांनी वास्तूदोष निवारण दृष्टीकोनातून आपल्या दालनात काही नूतनीकरणाचे काम सुचवले. मात्र, हे किरकोळ स्वरुपातील नूतनीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर महापौरांनी आपल्या दालनाचा प्रवेशमार्गच चक्क बदलला.
आजवर महापौर दालनातील प्रवेश हा पहिल्या प्रवेशमार्गातून व्हायचा. परंतु किशोरी पेडणेकर यांनी दालनाचा प्रवेशमार्ग बदलत बाजूच्या प्रवेशमार्गाचा वापर करण्यास सुरुवात केली. दालनाचा प्रवेशमार्गच बदलल्यामुळे अंतर्गत आसन व्यवस्थेतही थोडा बदल करावा लागल्याची माहिती सूत्रांनी दिली.
महापालिका मुख्यालयातील महापौर दालनाचे नूतनीकरण झाल्यांनतर काही महापौरांनी त्या-त्या वेळी आपल्या सूचनेनुसार आसन व्यवस्था बदलली होती. पण दालनात प्रवेशमार्ग बदलण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे आधीच्या महापौरांनी ज्या प्रवेशमार्गाचा वापर केला तोच प्रवेशमार्ग विद्यमान महापौरांना बदलावा, असं का वाटलं, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कोण आहेत किशोरी पेडणेकर?
Kishori Pednekar changes entrance