मुंबई : मुंबई महापालिकेत शिवसेनेची ताकद आणखी वाढणार आहे. काँग्रेस नगरसेवकाचं पद रद्द झाल्यानंतर शिवसेनेच्या एकनाथ ऊर्फ शंकर हुंडारे यांची नगरसेवकपदी नियुक्ती होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बीएमसीत शिवसेनेचं संख्याबळ एकाने वाढून 96 झालं (BMC Shivsena Power increased) आहे.
कांदिवली पूर्व येथील प्रभाग क्रमांक 28 चे काँग्रेसचे नगरसेवक राजपती यादव यांचं पद जात प्रमाणपत्रामुळे रद्द झालं आहे. जात पडताळणी समितीने केलेल्या कारवाईत यादव यांना दणका मिळाला. लघुवाद न्यायालयाने केलेल्या सुनावणीत त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार असलेल्या शिवसेनेच्या एकनाथ हुंडारे यांना नगरसेवक म्हणून नियुक्त केलं आहे.
2017 मध्ये झालेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत कांदिवली पूर्व मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार राजपती यादव विजयी झाले होते. त्यावेळी राजपती यादव यांचा जातीचा दाखला बनावट असल्याची तक्रार दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले उमेदवार एकनाथ हुंडारे यांनी जात पडताळणी समितीकडे केली होती.
हुंडारे यांच्या तक्रारीनंतर जात पडताळणी समितीने तपासणी केली असता, यादव यांचे ओबीसीचे जात प्रमाणपत्र बनावट असल्याचं आढळलं. त्यामुळे एप्रिल 2019 मध्ये त्यांचं नगरसेवकपद रद्द झाल्याची घोषणा पालिका सभागृहाने केली होती.
राजपती यादव यांनी जात पडताळणी समितीच्या निर्णयाला आधी मुंबई उच्च न्यायालयात, नंतर सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं. यादव यांच्या याचिका दोन्ही न्यायालयांनी फेटाळून लावल्यानंतर सोमवारी लघुवाद न्यायालयाने शिवसेनेच्या एकनाथ हुंडारे यांना नगरसेवक म्हणून घोषित केलं.
मुंबई महापालिकेतील पक्षीय बलाबल
शिवसेना – 96
भाजप – 83
काँग्रेस – 29
राष्ट्रवादी – 08
समाजवादी पक्ष – 06
एमआयएम – 02
मनसे – 01
दोन नगरसेवकांची प्रकरणे न्यायालयात प्रविष्ट
BMC Shivsena Power increased