मुंबई : राहुल गांधी देशाचे पंतप्रधान व्हावेत, अशी इच्छा काँग्रेसचे नेते वारंवार व्यक्त करत असतात. आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही अशीच इच्छा बोलून दाखवली आहे. राहुल गांधी हे देशाला 2024 मध्ये पंतप्रधान होतील, असा संदेश आज आम्ही प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून देत आहोत, असं नाना पटोले म्हणालेत.
देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा स्मृतिदिन आहे. त्यावर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आजचा हा दिवस सद्भावना दिवस आहे. राजीव गांधी यांनी अनेक क्रांतीकारी निर्णय घेतले. आजच सरकार हे केवळ घोषणाबाजी करणारं सरकार आहे. घोषणाबाज पंतप्रधान पहिल्यांदा आपण पाहतोय. मात्र या पूर्वी काँग्रेस पंतप्रधान यांनी खूप काही दिलं आहे, असं पटोले म्हणालेत.
दोन हजाराची नोट पुन्हा बँकेत जमा करण्याचे आदेश रिजर्व्ह बँकेने दिले आहेत. त्यावर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.दोन हजारची नोट बंद केली. हे खऱ्या अर्थाने तुगलकी पंतप्रधान आहेत का? असं लोकं बोलत आहेत. या देशाची सत्ता बदलण्याचा लोकांचा मानस आहे, असंही पटोले म्हणालेत.
या आधी निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या जागा अधिक असायच्या. त्यावेळी जागा वाटप करताना आम्हाला लहान भाऊ म्हणून कमी जागा मिळायच्या. पण आता आम्ही काँग्रेसपेक्षा मोठे भाऊ झालो आहोत. कारण काँग्रेसच्या 44 जागा आहेत. तर राष्ट्रवादीचे 54 आमदार आहेत, असं राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटलं आहे. त्यावर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आम्ही मोठे होतो तेव्हा कधीच गर्व केला नाही त्यांनीही गर्व करू नये. आम्ही नेहमी मोठे होतो मात्र आम्ही कधीही त्याचा गर्व केला नाही. सर्वांना सोबत घेऊन चाललो, असं पटोले म्हणालेत.
नाना पटोले यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. हे सरकर योजनाचा पाऊस पडत आहे. हे सरकार दारोदारी नाही, तर कुठेच राहत नाही. यांचं सामान्य लोकांकडे, शेतकऱ्यांकडे लक्ष नाही, असं पटोले म्हणालेत.